Tue, Nov 20, 2018 05:27



होमपेज › Ahamadnagar › आजी-माजी महापौरांच्या पतींमध्ये उडाली ठिणगी

आजी-माजी महापौरांच्या पतींमध्ये उडाली ठिणगी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा





नगर : प्रतिनिधी

शिवसेनेत गेले काही दिवस शमलेले अंतर्गत वाद पुन्हा एकदा उफाळून आले आहेत. उद्यान आणि योग केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमाचे नियोजन करतांना विश्‍वासात न घेतल्यामुळे आजी-माजी महापौर पतींमध्येच जोरदार खडाजंगी झाली. सोमवारी (दि.27) सायंकाळी महापालिकेतच हा वाद रंगल्यामुळे याची चर्चा काल (दि.29) दिवसभर सुरु होती. 

महापालिकेने महावीर इंटरनॅशनल या संस्थेला योग केंद्रासाठी जागा उपलब्ध करुन दिली आहे. माजी सभागृह नेते अनिल शिंदे यांच्या प्रभागात ही जागा असल्यामुळे त्यांनी यासाठी पत्र दिले होते. त्यानुसार महासभेत ठराव होऊन जागा देण्याचा निर्णयही झाला. काल या जागेवर महावीर उद्यान व प्राणायम योगा केंद्राच्या भूमिपूजनाचाही कार्यक्रम पार पडला. मात्र, या कार्यक्रमाचे नियोजन करतांना अनिल शिंदे यांनाच विश्‍वासात घेण्यात न आल्याने शिंदे व माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांच्यात वाद उफाळून आला आहे.

सोमवारी सायंकाळी महापौर दालनातील चर्चेचे शाब्दिक वादात रुपांतर होऊन दोघांमध्ये जोरदार खडाजंगीही झाली. मनपातून बाहेर पडतांना ‘पाहून घेण्याचे’ इशारे देण्यापर्यंत हा वाद विकोपाला गेल्यामुळे याची चर्चा काल मनपात सुरु होती. गेल्या वर्षभरात सत्ताधारी शिवसेनेत अंतर्गत संघर्षातून अनेकवेळा वाद निर्माण झाले आहेत. नगरसेवकांकडूनही बर्‍याच वेळा खदखद व्यक्त केली जाते. त्यानंतर आता पुन्हा दोन प्रमुख नेत्यांमध्येच वाद उफाळून आला असून येत्या काळातही या वादातून अंतर्गत कुरघोड्या रंगण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, मनपाच्या एका माजी पदाधिकार्‍याने काल या वादावर पडदा घालण्यासाठी प्रयत्न केल्याचेही सांगण्यात येत आहे.