होमपेज › Ahamadnagar › पोलिस चौकशीचे गुर्‍हाळ सुरुच

पोलिस चौकशीचे गुर्‍हाळ सुरुच

Published On: Jan 20 2018 1:38AM | Last Updated: Jan 19 2018 11:17PMनगर : प्रतिनिधी

पथदिवे घोटाळा उघडीस येवून 22 दिवस लोटले, चौकशी समितीचा अहवाल येवून त्यात मनपाची आर्थिक फसवणूक झाल्याचेही सिध्द झाले. त्यानंतर अद्यापही महापालिकेने पोलिसांकडे फिर्याद दाखल केली जात नसल्याने उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे. पोलिसांकडे चौकशी अहवाल सादर करुन कारवाई करण्याचे  पत्रही आयुक्‍तांनी दिले आहे. त्यानंतरही पोलिसांकडून अद्याप चौकशी सुरु आहे. फाईल चोरी, बनावट सहीबाबत पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे. त्याची चौकशी पोलिसांकडून सुरु आहे. चौकशी समितीचा अहवालही आयुक्‍त घनश्याम मंगळे यांनी पोलिसांकडे सादर केला आहे. प्रस्तावांवर सह्या असलेल्या कर्मचार्‍यांचे जबाब यापूर्वीच नोंदविण्यात आले होते. गुरुवारी (दि.18) पोलिस निरीक्षक सुरेश सपकाळे यांनी स्वतः पालिकेत येवून तीन तास तळ ठोकला. मुख्य लेखाधिकारी दिलीप झिरपे, विद्युत विभागाचे लिपिक भरत काळे यांची चौकशी केली आली. बांधकाम विभागातील दोन लिपिकांचीही त्यांनी चौकशी केली. 

उपायुक्‍त राजेंद्र चव्हाण, विक्रम दराडे यांचे जबाब बाकी असून ठेकेदार लोटके यांचीही चौकशी केली जाणार आहे. ठेकेदाराच्या बँक खात्यांचे तपशील मागवून त्याच्या खात्यातून कोणकोणत्या खात्यांवर व्यवहार झाले आहेत, याचीही तपासणी होणार आहे. दोन दिवसांत चौकशी पूर्ण करुन आयुक्‍तांची किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकार्‍यांची फिर्याद घेवून गुन्हा दाखल करण्यात येईल, असे पोलिस निरीक्षक सपकाळे यांनी सांगितले. मात्र, अद्यापही चौकशी सुरुच असल्याने गुन्हा दाखल होण्याची कार्यवाही लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. दुसरीकडे महापालिकेची लाखोंची फसवणूक होऊनही प्रशासनाकडून त्याची फिर्याद दिली जात नसल्याचे चित्र आहे. आयुक्‍तांकडून फिर्याद दाखल करण्यासाठी अधिकार्‍यांना प्राधिकृतही केले जात आहे. मात्र, त्यांच्या आदेशालाही विभागप्रमुख, प्रभाग अधिकारी कोलदांडा घालत असल्याचे चित्र आहे. आयुक्‍तांकडूनही अशा अधिकारी, कर्मचार्‍यांवर कारवाई होत नसल्याने त्यांच्या मवाळ भूमिकेविरोधात नगरकरांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे.