Wed, Jan 22, 2020 14:40होमपेज › Ahamadnagar › महिलांच्या सन्मानासाठी निकाल महत्त्वपूर्ण

महिलांच्या सन्मानासाठी निकाल महत्त्वपूर्ण

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

नगर : प्रतिनिधी

कोपर्डी घटनेचा निकाल हा महिलांचा सन्मान राखण्यासाठी व अत्याचार रोखण्यासाठी पडलेले महत्त्वपूर्ण पाऊल असल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते  राधाकृष्ण विखे यांनी दिली. समाजाच्या सर्व थरातील घटकांनी या अत्याचाराविरोधात उठवलेला आवाज पीडित कुटुंबीयांना न्याय मिळवून देणारा ठरला आहे. ही घटना अत्यंत संतापजनक होती. याची तीव्र प्रतिक्रिया समाजातील सर्व घटकांनी एकजुटीने दिल्यामुळेच घटनेचा तपास योग्य दिशेने झाला. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडल्यामुळे हा निकाल न्यायालयीन इतिहासात मैलाचा दगड ठरणार आहे. घटनेतील तीनही आरोपींना न्यायालयाने दिलेली फाशीची शिक्षा विचारात घेता, भविष्यात अशा दुर्दैवी घटनांना पायबंद लागून, कायद्याचा धाक निर्माण होईल, असा विश्‍वासही विखे यांनी व्यक्त केला. अपप्रवृत्तीला  धडा शिकविणारा  निकाल ः भोर  कोपर्डी निर्भया प्रकरणातील तिन्हीही नराधमांना फाशीची शिक्षा झाली आहे. न्यायालयाचा हा निकाल समाजातील अपप्रवृत्तीला धडा शिकविणारा आहे, अशी प्रतिक्रिया शिवप्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजीव भोर यांनी दिली.

कोपर्डी अत्याचाराची घटना घडल्यानंतर शिवप्रहार संघटनेचे कार्यकर्ते आठवडाभर कोपर्डी आणि कर्जत या ठिकाणी तळ ठोकून होते. समाजाच्या आंदोलनात ही संघटनेचे कार्यकर्ते सक्रि य होते. 
भोर म्हणाले, आरोपींनी अतिशय निर्घृणपणे अल्पवयीन मुलीची हत्या केली होती. अन्याय, अत्याचाराविरुद्ध सर्व समाज एकवटला होता. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मोठ-मोठे आंदोलने उभी राहिली.कोपर्डीतील खटल्याचा निकाल समाधानकारक आहे.या निर्णयाचे स्वागत आहे. न्यायालयाच्या निकालाने सर्व समाजाच्या लढ्याचा विजय झाला आहे. दिल्ली निर्भया प्रकरणातील आरोपींना अद्यापपर्यंत फाशीची शिक्षा झालेली नाही. गंभीर गुन्ह्यातील आरोपींना लवकरात-लवकर फाशी देण्यासाठी या पद्धतीने बदल करावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्र्यांचे फोनवरून  अ‍ॅड. निकम यांचे कौतुक निकालानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांना फोन करून विशेष अभिनंदन केले. अशा निकालांतून लोकांचा न्यायव्यवस्थेवरील विश्‍वास अधिक दृढ होतो, असे म्हणून सरकारी पक्षाची न्यायालयात चांगली बाजू मांडली म्हणून निकम यांचे कौतुक केले. निकम यांनी लढविलेल्या खटल्यात आतापर्यंत 44 जणांना फाशी व 635 जणांना जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. 

वाईट नजरेने पाहण्याची  हिंमत नको ः कॉ. स्मिता पानसरे कोपर्डी, लोणीमावळ्याच्या निकालाने समाजात चांगला संदेश जाणार आहे. महिला अत्याचारांच्या घटनेत अशा पद्धतीचे निकाल लागल्यास भविष्यात कोणाची महिलांकडे वाईट नजरेचे पाहण्याची हिंमत होणार नाही. समाजानेही अशा निकालांतून योग्य धडा घेतला पाहिजे.