Thu, Jul 18, 2019 14:25होमपेज › Ahamadnagar › एकाच कुटुंबातील 7 सख्खे भाऊ सराईत दरोडेखोर

एकाच कुटुंबातील 7 सख्खे भाऊ सराईत दरोडेखोर

Published On: Feb 11 2018 12:53AM | Last Updated: Feb 11 2018 12:53AMनगर : प्रतिनिधी

एकाच कुटुंबातील सख्खे भाऊ असलेले पाच सराईत दरोडेखोर स्थानिक गुन्हे शाखेने काल (दि. 10) पहाटेच्या सुमारास पकडले, तर 3 जण अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. पाथर्डी तालुक्यातील धनगरवाडी फाटा येथे ही कारवाई करण्यात आली. अटक केलेल्यांपैकी एक ‘मोक्का’च्या गुन्ह्यात फरारी होता. या टोळीने नगर जिल्ह्यात दरोडे, जबरी चोरीचे गुन्हे करताना तब्बल 8 जणांचा खून केल्याचा उलगडा झाला आहे. बीड, पुणे जिल्ह्यातही अनेक गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे. अटक केलेल्यांमध्ये संदीप ईश्‍वर भोसले (वय 23), धोंड्या ऊर्फ धोंडिराम ईश्‍वर भोसले (वय 24), मिलिंद ईश्‍वर भोसले (वय 22), नवनाथ ईश्‍वर भोसले (वय 20), पाल्या ऊर्फ जलील ईश्‍वर भोसले (वय 21, सर्व रा. बेलगाव, ता. कर्जत) यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून तलवार, लोखंडी टॉमी, लोखंडी कत्ती, लोखंडी कत्ती, कटावणी, तीन मोटारसायकली, तीन मोबाईल असा एकूण 61 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

यातील संदीप याच्याविरुद्ध पुणे ग्रामीण पोलिसांनी ‘मोक्का’ं अन्वये कारवाई केलेली आहे. आणखी तीन सराईत चोरटे अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले आहेत. त्यात अटल्या ऊर्फ अतुल ईश्‍वर भोसले, सचिन ईश्‍वर भोसले, नाज्या नेहर्‍या काळे यांचा समावेश आहे. त्यातील अटल्या ऊर्फ अतुल याच्याविरुद्ध बीड पोलिसांनी ‘मोक्का’ अन्वये कारवाई केलेली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांना पाथर्डी तालुक्यातील रेकॉर्डवरील आरोपी पाथर्डी ते माणिकदौंडी रस्त्यावरील धनगरवाडी फाटा येथे येणार असल्याची माहिती समजली होती.

त्यावरून निरीक्षक पवार यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक निरीक्षक शरद गोर्डे, कैलास देशमाने, उपनिरीक्षक राजकुमार हिंगोले, श्रीधर गुठ्ठे, कर्मचारी सुनील चव्हाण यांच्यासह गुन्हे शाखेच्या सर्व कर्मचार्‍यांच्या पथकाने त्या परिसरात सापळा रचला. धनगरवाडी फाटा येथून तीन मोटारसायकलवरून जाणार्‍या संशयितांना थांबण्याचा इशारा केला. त्यातील 5 जण पोलिसांच्या हाती लागले, तर अंधाराचा फायदा घेऊन तीन जण पसार झाले.  या टोळीविरुद्ध नगरसह बीड, पुणे जिल्ह्यात अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

खुनासह दरोड्याच्या नगर जिल्ह्यातील 8 गुन्ह्यांची त्यांनी कबुली दिली आहे. त्यात कर्जत येथील भापकर वकील, नेवासा येथील सोनवणे, अशोक लांगोरे व पाथर्डी येथील घटनांचा समावेश आहे. अटक केलेल्या पाचही जणांना शनिवारी दुपारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयात आरोपींनी अल्पवयीन असल्याचा दावा केला. त्यामुळे आरोपींना 14 फेब्रवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली असून, तोपर्यंत पोलिसांना आरोपीच्या वयाच्या पुरावा सादर करण्याचे आदेश दिले आहेत.