होमपेज › Ahamadnagar › ‘त्या’ शिक्षकांना अखेर धनादेश!

‘त्या’ शिक्षकांना अखेर धनादेश!

Published On: Jan 07 2018 2:00AM | Last Updated: Jan 06 2018 9:51PM

बुकमार्क करा
नगर : प्रतिनिधी

महापालिकेच्या शिक्षण विभागात कार्यरत असलेल्या शिक्षकांचे चार महिन्यांचे थकित वेतन अखेर काल (दि.6) आंदोलनानंतर अदा करण्यात आले आहे. या वेतनासाठी शिक्षकांनी सकाळपासून आंदोलन सुरू केले होते. महापौर सुरेखा कदम यांच्या हस्ते वेतनाचे धनादेश शिक्षकांना देण्यात आले. महापालिका शिक्षण विभागात कार्यरत असलेल्या शिक्षकांचे  निम्मे वेतन शासन देते. तर वेतनाचा निम्मा वाटा महापालिकेला उचलावा लागतो. या शिक्षकांचे निम्मे वेतन शासनाकडून जमा होऊनही महापालिकेने सप्टेंबर ते डिसेंबर या चार महिन्यांचे वेतन जमा केले नव्हते. त्याबाबत शिक्षकांनी प्राथमिक शिक्षक संघाच्या माध्यमातून आयुक्तांना वेळोवेळी पत्र देऊन वेतनाची मागणी केली होती. मात्र, त्याची प्रशासनाने दखल न घेतल्याने काल (दि.6) शिक्षकांनी मनपासमोर आंदोलन सुरू केले.

राष्ट्रवादी काँगे्रसचे शहर जिल्हाध्यक्ष माणिक विधाते, नगरसेवक संपत बारस्कर, नगरसेविका नसीम खेय यांनी आंदोलनात सहभाग घेतला. खासगी शाळा प्रथमिक शिक्षक संघानेही आंदोलनास पाठिंबा दिला. दरम्यान, मुख्य लेखाधिकारी दिलीप झिरपे यांनी शिक्षकांची भेट घेत वेतनाचा धनादेश तयार आहे, मात्र उपायुक्तांचा पदभार नगररचना सहाय्यक संचालक संतोष धोंगडे यांच्याकडे गेल्याने त्यांची स्वाक्षरी झाली नसल्याचे सांगितले. महापौर कदम यांनी याप्रकरणी लक्ष घातल्यानंतर धोंगडे यांचीही स्वाक्षरी झाली. त्यानंतर महापौर कदम यांच्या हस्ते शिक्षकांना थकित वेतनाचा धनादेश देण्यात आला.