Fri, Jul 19, 2019 05:12होमपेज › Ahamadnagar › नगरला स्ट्रिट लाईट अन्  शेवगावात एलईडी घोटाळा

नगरला स्ट्रिट लाईट अन्  शेवगावात एलईडी घोटाळा

Published On: Feb 05 2018 1:59AM | Last Updated: Feb 04 2018 10:12PM शेवगाव : रमेश चौधरी

शेवगाव नगरपरिषदेत एलईडी दिव्यांमध्ये आर्थिक घोटाळा झाल्याचा संशय आहे. या कामासाठी ई टेंडर काढण्यात आले नाही. काही दिवसांपूर्वी नेमलेल्या चौकशी समितीचा अहवाल दडपला गेला आहे. याची पारदर्शक चौकशी झाल्यास नगर महापालिकेसारखा शेवगावचाही घोटाळा उघड होण्याची शक्यता आहे. तीन वर्षापूर्वी शेवगाव शहराची ग्रामपंचायत बरखास्त होऊन त्याचे नगर परिषदेत रूपातंर करण्यात आले. त्यासाठी विविध संघटना व कामगार यांचे मोठे योगदान आहे. सरपंच जाणार, नगराध्यक्ष होणार, सदस्य जाणार, नगरसेवक येणार, याबाबत शहरात उत्सुकता निर्माण झाली. अर्थात त्याचवेळी नगराध्यक्ष कोण याचा अंदाज जवळपास संर्वानाच आला होता. नगरपरिषदेमुळे मोठ्या प्रमाणात शासणाचा निधी उपलब्ध होऊण शहराचा विकास होईल याच अपेक्षा सर्वांना होत्या. प्रथम नगराध्यक्ष व नगरसेवक होण्यासाठी अनेक इच्छुक स्वप्नात रंगले होते.

परिषदेसाठी निवडणूक झाली 21 प्रभागातून मतदारांनी शहराचा विकास करणारे नगरसेवक निवडले. राहिला विषय नगराध्यक्षांचा, तर तो ही अंदाजाप्रमाणे खरा ठरला गेला. पुढे अनेक समस्याचे निराकरण होऊन स्वच्छ व सुंदर शहराची कल्पना नागरिकांत तयार झाली. जो-तो आपल्या प्रभागात कोणती कामे झाली पाहिजेत, याच्या सूचना नगरसेवकांसमोर मांडू लागला. तसे प्रस्ताव परिषेदेत दाखल होऊ लागले. मात्र निधीच नाही, असे सांगण्यात वर्ष गेले त्यात प्रभारी अशा मुख्याधिकार्‍याची चिंता सतावत राहिली, ती आजही कायम आहे. पुढे निधी सुरू झाला शहराचा विकास बाजूला गेला. थोडक्या कामात जादा दामाचे मोल सुरु झाले. यात नगरसेवक आपल्या पदाचे भान विसरले.

पारदर्शकता हा तर विषयच संपला. काम करता करता शहरात उजेडाचा लखलखाट व्हावा, आणि याच अंधारातून आपण लखलखाट व्हावे, या उद्देशाने विजेच्या पोलवर एलईडी दिवे बसविण्याची संकल्पना सुरु झाली. 14 व्या वित्त आयोग निधीतून एलईडी दिवे बसविण्यासाठी 23 लाख 91 हजार 523 रुपयाचा आराखडा तयार करण्यात आला मंजुरीनंतर या कामाचे ई टेंडर काढण्या ऐवजी कामाचे तुकडे करुन साध्या निविदा काढण्यात आल्या. ही कामे परजिल्ह्यातील ठेकेदारास देण्यात आली. याचवेळी हे काम संशयात अडकले गेले. नंतर नगरोत्थान व इतर निधीतून 24 लाख 21 हजार 730 रुपये खर्चाचे एलईडी दिवे बसविले गेले यावेळीही ई टेंडर केले नाही.

दरम्यान या कामात मिळत असलेली बिदागी पाहून नगरपरिषदेच्या एका जबाबदार पदाधिकार्‍याने 14 व्या वित्त आयोगातून एकट्यासाठी 50 लाख रुपये व इतर मर्जीतील नगरसेवकाच्या प्रभागात 15 ते 20 लाख रुपये खर्चाची एलईडी दिवे बसविण्याचे काम सूचविले होते. त्याची टेंडर प्रक्रिया सुरु होती. मात्र शासनाने नुकतेच याबाबत सुधारीत परिपत्रक जारी केल्याने हे काम आता स्थगित झाले आहे.
नगरपरिषदेला विजेसाठी दिड कोट रुपयाचा निधी आला असताना इतर निधीतून यावर खर्च करण्यात काय स्वारस्थ आहे, हा संशोधनाचा भाग ठरत असून शहरात काही प्रभागात झालेल्या एलईडी, स्ट्रीट लाईट व विद्युत दुरुस्तीत मोठा घोटाळा असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

एवढा खर्च करुनही आज त्या प्रभागांत अंधाराच आहे. या बाबत चौकशीसाठी नागरी कृती समिती व मनसेच्या कार्यकर्त्यानी उपोषण केले होते. यावेळी तात्कालीन प्रभारी मुख्याधिकारी यांनी चौकशी समिती नेमली होती मात्र याच कारणावरुण त्यांची उचलबांगडी करण्यात आल्याने नंतर चौकशी अहवाल दडपण्यात आला. शहरात 2 हजार 156 विद्युत खांब आहेत पैकी 200 ते 250 खांबावर दर्जाहीन एलईडी दिवे बसविण्यात आले आहेत त्याचे दरही अवास्तव आहेत. एका विजेच्या खांबावर एलईडी दिवा व साहित्य यासाठी साधारण दोन ते तीन हजार रुपये खर्च झाला असावा मात्र तो 8 ते 15 हजार रुपये लावण्यात आला आहे.दुरुस्तीच्या नावाखाली हा निधी लाटला गेला, असा संशय असून जर हे काम झाले आहे, तर ते दाखवून द्यावे, असे मत काही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्याने या कामाची पारदर्शक चौकशी केल्यास नगर महापालिकेबरोबर  शेवगाव नगरपरिषदेचा मोठा घोटाळा उघड होण्याची शक्यता आहे.