Sat, Jun 06, 2020 06:22होमपेज › Ahamadnagar › शिंदे दंगलप्रकरणी 61 आरोपी मुक्त

शिंदे दंगलप्रकरणी 61 आरोपी मुक्त

Published On: Dec 28 2017 2:00AM | Last Updated: Dec 28 2017 2:00AM

बुकमार्क करा
नगर : प्रतिनिधी

कर्जत तालुक्यातील शिंदे गावात सन 2004 मध्ये झालेल्या जातीय दंगल प्रकरणातील 61 आरोपींची जिल्हा व सत्र न्यायालयाने काल (दि. 27) पुराव्याअभावी सुटका केली. न्या. रवींद्र पांडे यांनी हा निकाल दिला. या गुन्ह्यात एकूण 68 आरोपी होते. त्यातील एक मयत होता. दोन नावांच्या व्यक्ती अस्तित्वात नव्हत्या. इतर पाच आरोपी फरार होते. तत्कालीन पोलिस उपअधीक्षक कन्नरे यांनी गुन्ह्याचा तपास करून उर्वरित 61 आरोपींविरुद्ध कर्जत येथील न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. तब्बल 9 वर्षांनंतर सन 2013 मध्ये येथील जिल्हा व सत्र न्यायालयात खटल्याची सुनावणी सुरू झाली. या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. संघमित्रा वाघमारे यांनी काम पाहिले, तर आरोपींच्या वतीने अ‍ॅड. सुभाष काकडे यांनी बचाव केला. 

मुंबईतील एका वृत्तपत्रात गावातील दलितांवर सामाजिक बहिष्कार टाकल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यावरून 4 मार्च 2004 रोजी गावात सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सून मीराबाई आंबेडर आल्या होत्या. त्यांनी दलित वस्तीत बैठक घेतली. त्या निघून गेल्यानंतर दलित वस्तीत दंगल झाली. त्यात घरातील साहित्याची तोडफोड करून काहींना जिवे मारण्याचा प्रयत्न झाला होता. ही दंगल सुरू असताना जमाव पांगविण्यासाठी गावात बंदोबस्तास आलेेल्या पोलिसांनी हवेत गोळीबार केला होता. दलितांमध्ये अंतर्गत वाद होऊन झालेल्या पळापळीत काहीजण जखमी झाल्याचा बचाव आरोपीच्या वकिलांनी केला होता.