Tue, Jun 25, 2019 15:11होमपेज › Ahamadnagar › काय आहे सोनई हत्‍याकांड प्रकरण?

काय आहे सोनई हत्‍याकांड प्रकरण?

Published On: Jan 20 2018 11:58AM | Last Updated: Jan 20 2018 12:16PMअहमदनगर : पुढारी ऑनलाईन

नेवासा तालुक्यातील सोनई येथे प्रेमसंबंधातून मुलीच्या प्रियकरासह तिच्या दोन मित्रांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर संपूर्ण राज्‍यभर हे हत्‍याकांड गाजले होते. 

ही घटना आहे १ जानेवारी २०१३ ची. नगर जिल्ह्यातील सोनईच्या गणेशवाडी शिवारातील एक मुलगी नेवासा फाट्यावरील एका शैक्षणिक संकुलमध्ये शिक्षण घेत होती. ती बी. एड्‍.चे शिक्षण घेत होती. त्‍याच शैक्षणिक संस्‍थेत काम करणारा सचिन घारू याच्‍याशी तिचे प्रेमसंबंध निर्माण झाले. याबाबत मुलीच्‍या कुटुंबीयांना समजल्‍यानंतर त्‍यांनी याला विरोध केला. इतकेच नाही तर त्‍यांच्‍या मनात असलेल्‍या द्‍वेषाने या प्रकरणाला गंभीर वळण घेतले.   

पोपट ऊर्फ रघुनाथ विश्‍वनाथ दरंदले, रमेश विश्‍वनाथ दरंदले, प्रकाश विश्‍वनाथ दरंदले, गणेश ऊर्फ प्रवीण पोपट दरंदले, संदीप माधव कुर्‍हे, अशोक सुधाकर नवगिरे यांना मागासवर्गीय मुलासोबत मुलीचे प्रेमप्रकरण असल्याचे समजले. हे सर्वजण मुलीचे भाऊ, चुलत भाऊ, मावस भाऊ होते. या सर्वांनी मिळून मुलीचा प्रियकर सचिन सोहनलाल घारू (वय २३) याला जिवे मारण्याचा कट रचला. 

या सर्वांनी दरंदले वस्तीवरील टॉयलेट सेफ्टी टँकच्‍या दुरुस्तीचा बहाणा केला. यासाठी संदीप राजू थनवार, सचिन सोहनलाल घारू व तिलक राजू कंडारे यांना १ जानेवारी २०१३ रोजी बोलावण्‍यात आले. त्‍यांना दुरुस्‍तीसाठी जास्त पैसे देण्‍याचे आमिष दाखवण्‍यात आले. टँकची दुरुस्‍ती असताना संदीप थनवार यास सेफ्टी टँकच्या पाण्यामध्ये बुडवून ठार केले. तर पळून जाणाऱ्या राहुल कंडारे याच्‍यावर कोयत्याने वार करण्‍यात आला. सचिन घारूचाही वैरण कापण्याच्या अडकित्त्यामध्ये अडकवून खून करण्‍यात आला, ही घटना पोलिस तपासात समोर आली. 

अधिक वाचा : सोनई हत्‍याकांड : काय म्‍हणाले उज्‍ज्‍वल निकम?
 अधिक वाचा : सोनई हत्‍याकांड म्‍हणजे समाजाला लागलेली कीड : न्‍यायालय  
 अधिक वाचा : सोनई हत्‍याकांड प्रकरणी ६ दोषींना फाशी