Fri, Sep 21, 2018 04:33होमपेज › Ahamadnagar › जिल्हा पोलिस भरतीस सुरुवात

जिल्हा पोलिस भरतीस सुरुवात

Published On: Mar 13 2018 1:40AM | Last Updated: Mar 12 2018 11:44PMनगर : प्रतिनिधी

जिल्हा पोलिस भरती प्रक्रियेस सोमवारी (दि. 12) पहाटे पाच वाजता पोलिस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी अवघे 26 उमेदवार छाती, उंची या शारीरिक मोजमापात अपात्र ठरले. भरती प्रक्रियेदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे, बायोमॅट्रिक पद्धतीने ठसे घेणे, 1 हजार 600 मीटर धावणेत ‘चीप’चा वापर करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक रंजन कुमार शर्मा हे मैदानावर संपूर्ण भरती प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत.  

पहिल्या दिवशी एक हजार उमेदवारांना बोलाविण्यात आले होते. त्यातील प्रत्यक्षात 821 उमेदवार आले होते. 26 उमेदवार छाती, उंची या शारीरिक मोजमापात अपात्र ठरले. उर्वरीत 795 उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात आली. शर्मा यांच्यासह अपर पोलिस अधीक्षक घनश्याम पाटील, सहाय्यक पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, मनीष कलवानिया, उपअधीक्षक (गृह) यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक, उपनिरीक्षकांसह अनेक कर्मचारी, लिपिक भरती प्रक्रिया घेत आहे.

उमेदवारांची मैदानी चाचणी झाल्यानंतर त्यांना गुण वाचून दाखविले जातात. ते प्रत्यक्ष दाखवून गुणावर समाधान असेल, तर त्यांची स्वाक्षरी घेतली जात आहे. पोलिस अधीक्षक शर्मा हे उमेदवारांना सूचना देऊन सर्व प्रक्रियेवर बारीक लक्ष ठेवून आहेत. उमेदवारांना पिण्याच्या पाणी, तात्काळ वैद्यकीय उपचार, गुल्कोज आदीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. 34 कॅमेर्‍यांद्वारे सर्व भरती प्रक्रियेचे ध्वनीचित्रमुद्रण होत आहे. पहिल्या दिवशी एक हजार उमेदवारांना बोलविण्यात आले होते. मंगळवारपासून प्रत्येक दिवशी दीड हजार उमेदवारांना भरतीसाठी बोलाविण्यात आलेले आहे.