Thu, Jun 20, 2019 20:52होमपेज › Ahamadnagar › ठेकेदांराना कार्यालयात घेऊन बसू नका

ठेकेदांराना कार्यालयात घेऊन बसू नका

Published On: Feb 21 2018 1:21AM | Last Updated: Feb 21 2018 1:21AMनगर : प्रतिनिधी

प्रशासकीय अनागोंदी, ठेकेदारांचा प्रशासकीय कामातील वाढत्या हस्तक्षेपाच्या पार्श्‍वभूमीवर आयुक्‍त घनश्याम मंगळे यांनी महापालिकेच्या मुख्य कार्यालयातील विभागांमध्ये काल (दि.20) अचानक भेट दिली. ठेकेदारांना बरोबर घेवून बसू नका, अशी तंबी कर्मचार्‍यांना देतांनाच उपस्थित ठेकेदारांनाही त्यांनी कार्यालयातून हुसकावून लावले. दरम्यान, लेखाधिकार्‍यांच्या ‘बेवारस’ असलेल्या दालनालाही आयुक्‍तांनी टाळे ठोकले.
आयुक्‍त मंगळे यांनी सामान्य प्रशासन विभागात सरप्राईज व्हिजीट देऊन कर्मचार्‍यांच्या उपस्थितीबाबत आढावा घेतला.

यात तीन लिपिक अनुपस्थित असल्याने त्यांना आयुक्‍तांनीच कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. त्यानंतर आयुक्‍तांनी मुख्य लेखाधिकार्‍यांच्या दालनाकडे मोर्चा वळविला. यावेळी लेखाधिकारी दिलीप झिरपे गैरहजर असल्याने त्यांच्या दालनाला आयुक्‍तांनी टाळे ठोकून दालन चक्क ‘सील’ केले. तेथून बांधकाम विभागात आढावा घेण्यासाठी आलेल्या आयुक्‍तांना नेहमीप्रमाणे ठेकेदार-कर्मचार्‍यांच्या एकत्रित कारभाराचे दर्शन घडल्याने ते चांगलेच संतापले. ठेकेदारांना कार्यालयाच्या बाहेर हुसकावून यापुढे ठेकेदारांना बरोबर घेवून बसू नका, अन्यथा कारवाई केली जाईल, अशी तंबीही त्यांनी कर्मचार्‍यांना दिली.

आयुक्‍तांनी दिलेल्या या सरप्राईज व्हिजीटमुळे कर्मचार्‍यांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली. तसेच लेखाधिकार्‍यांच्या दालनाला टाळे ठोकून ते सील केल्याने मनपा वर्तुळात याची चर्चा रंगली होती. दरम्यान, विविध विभागांमधील कर्मचार्‍यांच्या उपस्थितीबाबत आढावा घेतल्याचे व अनुपस्थित कर्मचार्‍यांना नोटिसा बजावण्यात आल्याचे आयुक्‍त मंगळे यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले. लेखाधिकारी कार्यालयात कधीच बसत नाही, अशा तक्रारी वारंवार होतात. आजही ते नव्हते. त्यामुळे त्यांच्या दालनाला सील ठोकून प्रतिकात्मक स्वरुपात कारवाई केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आयुक्‍तांच्या कारवाईनंतर लेखाधिकारी झिरपे यांचा किरकोळ रजेचा अर्ज आयुक्‍तांकडे सादर झाला.