Thu, Jul 18, 2019 17:13होमपेज › Ahamadnagar › नगर बॉम्बस्फोटामागे काश्मिरी नाही

नगर बॉम्बस्फोटामागे काश्मिरी नाही

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

नगर : प्रतिनिधी

यापूर्वीचे हल्ले हे समाजात दहशत निर्माण करण्यासाठी केवळ संदेश देण्यापुरते मर्यादित होते. परंतु, नगरमधील पार्सल बॉम्बस्फोटामागे ‘टार्गेट’ ठरवून दहशत निर्माण करण्याचा हेतू असल्याचे दिसून येत आहे. चिठ्ठीतील मजकूर व भाषा पाहता या  स्फोटामागे काश्मिरी नसल्याचे आपल्याला वाटते. त्यामुळे या स्फोटाचा सखोल तपास केला पाहिजे, अशी मागणी ‘सरहद्द’ संस्थेचे अध्यक्ष संजय नहार यांनी काल (दि. 26) पत्रकारांशी बोलताना केली. 

नहार यांनी सोमवारी आनंदऋषी रुग्णालयात जाऊन जखमी संजय क्षीरसागर यांची विचारपूस केली. तसेच जखमींना आर्थिक मदत केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना नहार म्हणाले की, यापूर्वी झालेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या तुलनेत यावेळचा हल्ला वेगळा होता. दहशतवाद्यांनी संदेशासोबत कृती करण्याचाही प्रयत्न केला आहे. त्यात दोन निष्पाप जखमी होऊन त्यांना नाहक त्याचे परिणाम भोगावे लागले. ज्यावेळी देशात मानवतेच्या दृष्टिकोनातून शांततेचे काम सुरू केले, त्यादिवशी शहीद भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांची प्रेरणा घेतलेली आहे. त्यामुळे मृत्यूची भीती वाटत नाही. उलट मला संपविले असते, तर माझा विचार देशभरात अधिक तीव्रतेने पोहोचला असता. 20-25 वर्षे काम करून जितका प्रचार माझ्या विचारांचा झाला नाही, तो एका दिवसात हल्ल्याच्या प्रयत्नामुळे झाला आहे. त्यामुळे कोणी संपविण्याचा प्रयत्न केला, म्हणून शांततेचे काम थांबणार नाही. कारण विचार कधीच थांबत नाही. 

आपण सुरू केलेले काम बंद करावे, असा संदेश देण्यासाठीच या हल्ल्याचा कट रचल्याचे दिसून येते. कोणी भविष्यात त्या मार्गाने जाऊ नये, म्हणून हल्लेखोरांनी व्यवस्थितपणे नियोजन केलेले होते. सुरक्षित म्हटल्या जाणार्‍या राज्यात अशा घटना यापूर्वी घडलेल्या नाहीत. याचा वेळेत बिमोड झाला नाही, तर भविष्यात त्याचे परिणाम भोगावे लागतील, असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांचे ट्विट का नाही?

मानवाधिकार चळवळीचे अ‍ॅड. असिम सरोदे म्हणाले की, कोणत्याही साध्या विषयावर ट्विट करणारे, प्रतिक्रिया देण्याची घाई करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नगरमधील बॉम्बस्फोटाबाबत अजून गप्प आहेत. ते काहीही बोललेले नाहीत. जखमींची विचारपूस करण्यासाठी आले नाहीत. त्यांच्याकडून मदतीचे आश्‍वासनही दिले गेले नाही, असा आरोप त्यांनी केला. 

जखमींना शासकीय मदत नाही

स्फोटासारखी गंभर घटना घडूनही जखमी झालेल्यांची चौकशी करण्यासाठी कोणताही मंत्री रुग्णालयाकडे फिरला नाही. याबाबत बोलताना नहार म्हणाले की, शासनाने जखमींचा मदत करणे अपेक्षित होते. हल्ल्यात कोण मेले, तर त्याला एक कोटी द्यायचे अन् दुसर्‍याची विचारपूसही करायची नाही, हे धोरण काही कामाचे नाही. अशा हल्ल्यात जखमी झालेल्यांच्या मदतीसाठी शासनाला निश्‍चित धोरण तयार करावे लागणार आहे.
 


  •