Sat, Aug 24, 2019 22:04होमपेज › Ahamadnagar › श्रीपाद छिंदमचा राजीनामा स्वीकारणार!

श्रीपाद छिंदमचा राजीनामा स्वीकारणार!

Published On: Feb 20 2018 1:21AM | Last Updated: Feb 20 2018 12:01AMनगर :  प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्‍तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होऊन न्यायालयीन कोठडीत असलेल्या श्रीपाद छिंदम याचा उपमहापौर पदाचा राजीनामा महापौरांकडून मंजूर करण्यात येणार आहे. मनपा अधिनियमातील तरतुदी व तांत्रिक बाबींबाबत आज (दि.20) विधिज्ञांशी चर्चा करुन राजीनामा स्वीकारला जाणार असल्याचे सांगण्यात आले. श्रीपाद छिंदम व मनपा कर्मचारी अशोक बिडवे यांच्यातील संवादावेळी छिंदम याने छत्रपती शिवरायांबाबत आक्षेपार्ह वक्‍तव्य केल्याची ऑडियो क्‍लिप शुक्रवारी (दि.16) सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. सर्वच स्तरातून याबाबत संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. 

भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष खा. दिलीप गांधी यांनीही छिंदम याची पक्षातून हकालपट्टी करत त्याच्याकडून उपमहापौर पदाचा राजीनामा घेतला आहे. त्यानंतर दुसर्‍यादिवशी छिंदमने खा. गांधी यांच्याकडे सोपविलेल्या राजीनाम्याची प्रत महापौर सुरेखा कदम यांच्याकडे प्राप्त झाली. मात्र, सदरचे राजीनामा पत्र हे महापौरांच्या नावे नसल्याने संभ्रम निर्माण झाला होता. याबाबत पदाधिकार्‍यांनी वकिलांशी चर्चा करुन तांत्रिक बाबींची माहिती घेतली. राजीनामा स्वीकारण्यास तांत्रिक अडचणी नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आज महापौरांकडून राजीनामा स्वीकारला जाणार आहे. राजीनामा मंजूर करुन प्रशासनाकडे सादर करण्यापूर्वी वकिलांकडून अभिप्राय घेतला जाणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.