Tue, Nov 13, 2018 04:26होमपेज › Ahamadnagar › श्रीपाद छिंदमचा राजीनामा मंजूर

श्रीपाद छिंदमचा राजीनामा मंजूर

Published On: Feb 21 2018 1:21AM | Last Updated: Feb 21 2018 1:21AMनगर  : प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्‍तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होऊन न्यायालयीन कोठडीत असलेल्या श्रीपाद छिंदम याचा उपमहापौर पदाचा राजीनामा महापौरांकडून मंजूर करण्यात आला आहे. महापौर सुरेखा कदम यांनी काल (दि.20) राजीनामा स्वीकारुन नगरसचिवांमार्फत प्रशासनाकडे प्रस्ताव सादर केला. दरम्यान, छिंदमचे नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी शिवसेना, मनसे व भाजप नगरसेवकांनी केली असून यावर निर्णय घेण्यासाठी सोमवारी (दि.26) महापौरांनी विशेष सभेचे आयोजन केले आहे.

श्रीपाद छिंदम व मनपा कर्मचारी अशोक बिडवे यांच्यातील संवादावेळी छिंदम याने छत्रपती शिवरायांबाबत आक्षेपार्ह वक्‍तव्य केल्याची ऑडियो क्‍लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. सर्वच स्तरातून याबाबत संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष खा. दिलीप गांधी यांनीही छिंदम याची पक्षातून हकालपट्टी करत त्याच्याकडून उपमहापौर पदाचा राजीनामा घेतला. त्यानंतर दुसर्‍यादिवशी छिंदमने खा. गांधी यांच्याकडे सोपविलेल्या राजीनाम्याची प्रत महापौर सुरेखा कदम यांच्याकडे सादर करण्यात आली.

सदरचे राजीनामा पत्र हे महापौरांच्या नावे नसल्याने संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, राजीनाम्याची मूळ प्रत असल्याने प्रशासन व पदाधिकार्‍यांशी चर्चा करुन तसेच विधिज्ञांचा सल्ला घेवून महापौर कदम यांनी काल राजीनामा मंजूर केला. दरम्यान, छिंदमचे नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी महापौरांकडे करण्यात आली आहे. सभागृह नेते गणेश कवडे, स्थायी समितीच्या सभापती सुवर्णा जाधव, महिला बालकल्याणच्या सभापती सारिका भुतकर, उपसभापती सुनीता मुदगल, माजी सभागृह नेते अनिल शिंदे, माजी सभापती सचिन जाधव, शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते, संजय शेंडगे, नगरसेवक दत्तात्रय कावरे, बाबासाहेब वाकळे, उषा नलवडे, अनिता राठोड, समद खान,

योगीराज गाडे, डॉ. सागर बोरुडे, प्रतिभा भांगरे, विक्रम राठोड आदी नगरसेवकांनी पत्र देवून ही मागणी केली आहे. त्यानुसार तात्काळ प्रस्ताव तयार होऊन प्रशासनाच्या मंजुरीने महासभेकडे पाठविण्यात आला. महापौर कदम यांनीही नगरसेवकांची मागणी विचारात घेवून याबाबत निर्णय घेण्यासाठी सोमवारी विशेष महासभेचे आयोजन केले आहे. छिंदम याचे नगरसेवक पद रद्द करण्याचा ठराव महासभेत केला जाणार असून त्यानंतर मंजुरीसाठी तो शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.