Sun, Mar 24, 2019 12:24होमपेज › Ahamadnagar › पोलिस उपअधीक्षक मुंढे, शेख यांना राष्ट्रपतीपदक 

पोलिस उपअधीक्षक मुंढे, शेख यांना राष्ट्रपतीपदक 

Published On: Aug 15 2018 1:22AM | Last Updated: Aug 15 2018 1:22AMनगर : प्रतिनिधी

जिल्ह्यात कार्यरत असलेले पोलिस उपअधीक्षक सुदर्शन मुंढे व साहायक फौजदार जलील शेख यांना राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर करण्यात आले आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला ही पदके जाहीर करण्यात आली आहेत.

मुंढे हे सध्या कर्जत उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. ते सन 1986 रोजी पोलिस उपनिरीक्षक म्हणून खात्यात रुजू झाले. साहायक पोलिस निरीक्षक, निरीक्षक, पोलिस उपअधीक्षक अशी बढती त्यांना मिळाली. त्यांनी नगरसह औरंगाबाद ग्रामीण, औरंगाबाद शहर, बीड, नांदेड, बुलढाणा, अमरावती येथे काम केले. त्यांना आतापर्यंत 506 बक्षिसे, वरिष्ठ अधिकार्‍यांची 54 प्रशस्तीपत्रके मिळाली आहेत. मुंढे यांनी आतापर्यंत 55 दरोडे, 107 घरफोड्या, 57 जबरी चोर्‍या व 14 किचकट स्वरुपाचे खून उघडकीस आणले आहेत. बीड येथे बँकेवर पडलेल्या दरोड्यातील सर्व रक्कम जप्त केली होती. तसेच साडेतीन कोटी रुपयांची अफूची शेती उद्ध्वस्त केली. लाचलुचपत प्रतिबंधक खात्यात असताना 55 यशस्वी सापळे केले. अलिकडच्या काळात जामखेड येथे केवळ धड असलेले प्रेत मिळाले होते. मुंढे यांनी डीएनए तपासणी करून मयताची ओळख पटवून खुनाचा प्रकार उघडकीस आणला होता. 

सहाय्यक फौजदार जलील शेख हे सध्या मानवी हक्क संरक्षण विभागात कार्यरत आहेत. ते सन 1984 मध्ये पोलिस शिपाई म्हणून नगर जिल्हा पोलिस दलात भरती झाले. त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेसह वेगवेगळ्या ठिकाणी सेवा केली. कोठेवाडी दरोडा, जगदीश भोसले खून प्रकरणाच्या तपासात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजाविली. त्यांना आतापर्यंत 664 बक्षिसे मिळाली आहेत.