Sat, Apr 20, 2019 10:27होमपेज › Ahamadnagar › पांगरमल दारुकांडातील दुग्गलचा मृत्यू

पांगरमल दारुकांडातील दुग्गलचा मृत्यू

Published On: Mar 26 2018 1:34AM | Last Updated: Mar 25 2018 10:57PMनगर : प्रतिनिधी

पांगरमल विषारी दारूकांडासह ‘मोक्का’तील आरोपी मोहन श्रीराम दुग्गल याचा नाशिकच्या ‘सिव्हिल’ हॉस्पिटल येथील कोठडीत उपचारादरम्यान शनिवारी (दि. 24) मृत्यू झाला. नाशिक रोड कारागृहात असताना त्याच्यावर काही दिवसांपासून वैद्यकीय उपचार सुरू होते.  दुग्गल याला ‘टीबी’ची बाधा झाल्याने तो चार महिने मुंबईतील सरकारी रुग्णालयात होता. तेथील उपचारानंतर पुन्हा नाशिक रोड कारागृहात आणण्यात आले होते. रुग्णालयात त्याला अर्धांगवायूचा झटका आला होता. त्यानंतर दुग्गल याला पुन्हा नाशिक सिव्हिल हॉस्पिटलच्या कोठडीत उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. 
दुग्गल याच्या मृत्यूने विषारी दारुकांडातील मयत आरोपींची संख्या दोन झालेली आहे.

यापूर्वी या गुन्ह्यातील आरोपी राजू बुगे (रा. नालेगाव) याचा पुणे जिल्ह्यात अपघाती मृत्यू झाला होता. याबाबत माहिती अशी की, फेब्रुवारी 2017 मध्ये पांगरमल येथे झालेल्या निवडणुकीच्या ‘ओल्या’ पार्टीत 9 जणांचा बळी गेला होता. त्यानंतर नगरच्या जिल्हा रुग्णालयाच्या कँन्टीनमधून चालणारे बनावट विषारू दारुचे उघडकीस आले. येथील विषारी दारुने जिल्ह्यातील 14 जणांचा बळी घेतला होता. याप्रकरणी एमआयडीसी, नेवासा, नगर तालुका व कँप पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

तसेच आरोपींविरुद्ध ‘मोक्का’ अन्वये कारवाई करण्यात आलेली होती. पांगरमल दारुकांडाचा तपास ‘सीआयडी’मार्फत सुरू आहे. सुमारे 13 महिन्यांपासून मोहन दुग्गल याला अटक करण्यात आलेली आहे. तो नाशिक रोड कारागृहात होता.  रुग्णालयात असताना त्याच्यावर अनेकदा उपचार करण्यात आले होते. त्याला पुन्हा अस्वस्थ वाटू लागल्याने नाशिक येथील शासकीय रुग्णालयातील कोठडीत उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना शनिवारी (दि. 24) दुपारी दुग्गल याचा मृत्यू झाला. त्याच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी बाकी असल्याने रविवारी (दि. 25) रात्री उशिरापर्यंत मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलेला नव्हता.