होमपेज › Ahamadnagar › ‘नगरोत्थान’च्या फायली सील

‘नगरोत्थान’च्या फायली सील

Published On: Mar 24 2018 1:45AM | Last Updated: Mar 24 2018 1:45AMनगर : प्रतिनिधी

नगरोत्थान योजनेअंतर्गत झालेल्याही पथदिव्यांच्या कामातही रोहिदास सातपुते याने गैरप्रकार केल्याचे चौकशीतून पुढे आलेले आहे. त्यामुळे काल (दि. 23) तोफखाना पोलिसांनी नगरोत्थान योजनेशी संबंधित फायली असलेले कपाट सील केले आहे. पोलिस कोठडीत असलेल्या बाळासाहेब सावळे याला शुक्रवारी महापालिकेतील विद्युत विभागात नेण्यात आले होते. 

पथदिव्यांच्या वादग्रस्त कामांच्या फायलींवर मनपा अधिकार्‍यांच्या सह्या घेण्यासाठी सदर फायली ठेकेदार सचिन लोटके हा घेऊन फिरत होता. आता या फायली नेमक्या कोणाकडे आहेत, हे मला निश्‍चित सांगता येणार नसल्याचा जबाब सावळे याने पोलिसांत दिलेला आहे. गुन्ह्याचे तपासी अधिकारी सुरेश सपकाळे यांनी सावळे याला शुक्रवारी दुपारी महापालिकेतील विद्युत विभागात नेऊन त्याची चौकशी करण्यात आली. 

तसेच पोलिसांनी बजेट रजिस्टर घेऊन मुख्य लेखा परीक्षकांना महापालिका इमारतीत बोलाविलेले आहे. ‘केडीएमसी’चे काम पाहणार्‍या कर्मचार्‍यांचीही माहिती तोफखाना पोलिसांनी महापालिका प्रशासनाकडे लेखी स्वरुपात मागितलेली आहे. सावळे याला सोमवारपर्यंत (दि. 26) पोलिस कोठडी आहे. आरोपी रोहिदास सातपुते हा सापडल्यानंतरच गायब करण्यात आलेल्या फायली नेमक्या कोणाकडे आहेत, हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे पोलिसांकडून त्याचा कसून शोध सुरू आहे.
 

 

tags : nagar,news, Nagorothan, scheme, Street, lights, irregularities, Files, Seal,