Wed, Jul 17, 2019 10:31होमपेज › Ahamadnagar › तक्रारींसाठी नगर  मनपाचे मोबाईल अ‍ॅप!

तक्रारींसाठी नगर  मनपाचे मोबाईल अ‍ॅप!

Published On: Apr 29 2018 11:53PM | Last Updated: Apr 29 2018 11:38PMनगर : मयूर मेहता

परिसरातील समस्या, तक्रारींसाठी मनपात हेलपाटे मारणार्‍या नागरिकांना दिलासा देण्यासाठी मनपाने तीन वर्षांपूर्वी एसएमएस व व्हॉट्सअ‍ॅप तक्रार सुविधा उपलब्ध करुन दिली होती. त्यानंतर आता हायटेक पाऊल टाकत मनपाने तक्रार निवारणासाठी ‘एएमसी केअर’ हे मोबाईल विकसित केले आहे. त्याच्या जोडीला ‘वेबपेज’चा पर्यायही मनपाने उपलब्ध करुन दिला असून कर्मचारी व खातेप्रमुखांना याचे प्रशिक्षण देण्यात आल्यानंतर महापौर व आयुक्‍तांच्या हस्ते या ‘अ‍ॅप’चे लोकार्पण करण्यात येणार आहे.

2015 मध्ये महापालिकेने ‘व्हॉट्सअ‍ॅप’द्वारे तक्रारी करण्याची सुविधा नागरिकांना उपलब्ध करुन दिली होती. सुरुवातीच्या काळात याला चांगला प्रतिसादही मिळाला. मात्र, मनपातील अपुर्‍या कर्मचार्‍यांचा प्रश्‍न व अधिकार्‍यांच्या दुर्लक्षामुळे तक्रारींचे निरसन होण्यास विलंब होत गेला. परिणामी, नागरिकांचा प्रतिसादही कमी झाला. सध्याच्या डिजिटल क्रांतीच्या युगात हे तंत्रज्ञानही जुने झाल्यामुळे मनपाने पुढचे पाऊल टाकत मोबाईल अ‍ॅप व वेबपेजही विकसित केले आहे. ‘एएमसी केअर’ या मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून नागरिकांना घरबसल्या आपल्या परिसरातील समस्यांबाबत तक्रारी करता येणार आहेत. प्रभाग समिती कार्यालयाचे क्षेत्र व विभाग निवडून नागरिकांना आपली तक्रार मांडता येणार आहे. त्यासाठी नागरिकांना स्वतःचे नाव, मोबाईल क्रमांक टाकून तक्रारीचा तपशील देता येणार आहे. त्यासोबत फोटो देण्याची सुविधाही मनपाने उपलब्ध करुन दिली आहे.

नागरिकांनी नोंदविलेल्या तक्रारी सर्व्हरवरुन थेट संबंधित विभागाच्या कर्मचार्‍याच्या मोबाईलवर जाणार आहेत. ठराविक मुदतीत या कर्मचार्‍याने तक्रारीचे निरसन न केल्यास ती तक्रार सर्व्हरवरुन संबंधित विभागप्रमुखाकडे व त्यानंतर उपायुक्‍त, अतिरिक्‍त आयुक्‍त व आयुक्‍त अशा वरीष्ठ अधिकार्‍यांपर्यंत वर्ग होणार आहे. तक्रारींचे निरसन करण्यासाठी कर्मचारी, विभागप्रमुखांना ठराविक मुदत मिळणार असून त्यानंतरही ती निकाली न निघाल्यास वरीष्ठ अधिकार्‍यांकडे ती वर्ग होणार आहे. मोबाईल अ‍ॅपसह  वेबपेजवरुन नागरिकांना तक्रारी करता येणार आहेत. सध्याच्या युगात अँड्रॉईड, स्मार्टफोन वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिकांना या मोबाईल अ‍ॅप व वेबपेजवरुन तक्रार नोंदविणे सहज शक्य होणार आहे. सीस्केप सॉफ्टवेअर या कंपनीने हे अ‍ॅप विकसित ोकेले आहे. येत्या गुरुवारी मनपा कर्मचारी, खातेप्रमुखांना या अ‍ॅपचे प्रशिक्षण देण्यात येणार असून त्यानंतर महापौर व आयुक्‍तांच्या हस्ते या अ‍ॅपचे लोकार्पण करण्यात येणार आहे.