होमपेज › Ahamadnagar › बँकांकडून व्याज आकारणी सुरूच!

बँकांकडून व्याज आकारणी सुरूच!

Published On: Feb 21 2018 1:21AM | Last Updated: Feb 21 2018 1:21AMनगर : प्रतिनिधी

राज्य सरकारने जुलै 2017 अखेरच्या कर्जावर शेतकर्‍यांना कर्जमाफी दिली. प्रत्यक्षात माफी मिळेपर्यंत जानेवारी महिना उजाडला. मधल्या सहा महिण्यांचे व्याज शेतकर्‍यांकडून न घेण्याचे आवाहन शासनाने करूनही बँकांकडून व्याजाची आकारणी मात्र करण्यात येत आहे. नवीन कर्जासाठी व्याज भरण्याची सक्ती होत असल्याने शेतकर्‍यांकडून मात्र नाराजी व्यक्त होत आहे.

कर्जमाफी देतांना उर्वरित सहा महिण्यांचे व्याज कुणी भरायचे? असा प्रश्‍न बँकांसमोर होता. शासनाकडून याबाबत मार्गदर्शक सूचना न आल्याने बँकांनी वरील व्याजाची रक्कम शेतकर्‍यांकडून वसूल करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार व्याज आकारणी करण्यात येत आहे. शेतकरी नवीन कर्ज घेण्यासाठी बँकेत गेल्यावर पूर्वीच्या कर्जाचे सहा महिण्याचे व्याज भरल्यानंतरच नवीन कर्ज देण्यात येत आहे. कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यातील लाभार्थी शेतकर्‍यांचा समावेश असणार्‍या एकूण सहा  ग्रीान लिस्ट आल्या.

त्यात 2 लाख 70 हजार 889 लाभार्थीं शेतकर्‍यांसाठी 551 कोटी रूपये प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 529 कोटी रूपये शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत. नुकतीच 10 हजार 373 लाभार्थी शेतकर्‍यांचा समावेश असणारी सहावी  ग्रीन लिस्ट काढण्यात आली असून, त्यासाठी लवकरच निधी प्राप्त होणार आहे.

सहाव्या ग्रीन लिस्टमधील 10 हजार 373 शेतकर्‍यांसाठी 26 कोटी 50 लाख 82 हजार 943 रुपयांची गरज आहे. सर्व सहा ग्रीन लिस्टमधील शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी 837 कोटींची गरज आहे. त्यापैकी 551 कोटी रुपये जिल्हा बँकेला प्राप्त झाले आहेत. 551 कोटींपैकी 529 कोटी जमा झाले असून, उर्वरित रक्कम लवकरच जमा करण्यात येणार आहे.