Sun, Aug 25, 2019 03:59होमपेज › Ahamadnagar › सोनईमध्ये पकडले ‘डमी’ विद्यार्थी

सोनईमध्ये पकडले ‘डमी’ विद्यार्थी

Published On: Mar 05 2018 1:40AM | Last Updated: Mar 05 2018 12:07AMनगर : प्रतिनिधी

दहावीच्या परीक्षेत ‘डमी’ विद्यार्थी बसविल्याचा प्रकार समोर आला आहे. नेवासा तालुक्यातील सोनई येथे परीक्षेत ‘डमी’ बसलेल्या दोन विद्यार्थ्यांना विद्यालयाच्या पथकाने पकडले. या दोन विद्यार्थ्यांसह बनावट हॉल तिकीट तयार करणारा दुकानदार, अशा तिघांवर सोनई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी दहावीचा मराठी विषयाचा पेपर होता. सोनईत यासाठी मुळा पब्लिक स्कूलमध्ये परीक्षा केंद्र देण्यात आलेले आहे. सकाळी दहा वाजता परीक्षेस सुरुवात झाली. कॉपी होऊ नये, यासाठी असलेल्या शाळेच्या पथकाने पेपर सुरु झाल्यानंतर सर्व वर्गांत तपासणी सुरु केली. या तपासणीमध्ये परीक्षा केंद्र 2191 मधील ब्लॉक नंबर 14 मध्ये दोन डमी विद्यार्थी बसल्याचे त्यांच्या लक्षात आले. 

या विद्यार्थ्यांकडे अधिक चौकशी केली असता, ते डमी असल्याचे सिद्ध झाले. हे दोन्ही विद्यार्थी अल्पवयीन आहेत. यातील एक विद्यार्थी हा राहुरी तालुक्यातील उंबरे येथील, तर दुसरा विद्यार्थी हा नेवासा तालुक्यातील पिंप्री अवघड येथील आहे. दोन्ही अल्पवयीन आरोपींनी परीक्षेस बसण्यासाठी बनावट हॉल तिकीट तयार करून घेतले होते. सोनई येथील आशीर्वाद झेरॉक्स या दुकानदाराने त्यांना बनावट हॉल तिकीट तयार करून दिले होते.

त्यामुळे या दुकानदारावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शाळेतील शिक्षक बाबासाहेब भानुदास मुसमुडे (वय 56, रा. सोनई, ता. नेवासा) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपींवर महाराष्ट्र विद्यापीठ, बोर्ड आणि इतर विनिर्दिष्ठ परीक्षांमध्ये होणारे गैरव्यवहारांना प्रतिबंध कायदा 1982 चे कलम 7 सह भादंवि 468, 471, 420, 34 अन्वये गुन्ह्याची नोंद झाली असून, पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक किरण शिंदे करत आहेत.