Thu, Jun 27, 2019 16:25होमपेज › Ahamadnagar › न्यायालयाचा निर्णय मान्य करणार!

न्यायालयाचा निर्णय मान्य करणार!

Published On: Mar 18 2018 1:07AM | Last Updated: Mar 17 2018 11:17PMनगर : प्रतिनिधी

जिल्हा  बँकेची भरती प्रक्रिया वादग्रस्त ठरल्यानंतर विभागीय सहनिबंधक मिलिंद भालेराव यांनी भरती प्रक्रियाच रद्द केली. याविरोधात उच्च न्यायालयात परीक्षार्थींना विविध याचिका दाखल केलेल्या असल्याने याबाबत न्यायालयाचा निर्णय आल्यावरच पुढील कार्यवाही करण्याचा निर्णय जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या सभेत घेण्यात आला.

संचालक मंडळाची सभा बँकेच्या स्व. मारुतराव घुले पाटील सभागृहात घेण्यात आली. सभेस बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर, उपाध्यक्ष रामदास वाघ, संचालक आ. शिवाजी कर्डीले, आ. वैभव पिचड, उदय शेळके, अण्णासाहेब म्हस्के, दत्तात्रय पानसरे, रावसाहेब शेळके, मीनाक्षी साळुंके मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे आदी उपस्थित होते. जेष्ठ संचालक यशवंतराव गडाख, चंद्रशेखर घुले यांनी मात्र बैठकीकडे पाठ फिरवली.

जिल्हा बँकेच्या 465 पदांच्या भरती प्रक्रिया 28 फेब्रुवारी रोजी विभागीय सहनिबंधकांनी रद्द केली. भरती प्रक्रियेत अनियमितता असल्याचे उघड झाल्याने हा निर्णय घेण्यात आला होता. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांचा मुलगाच परीक्षा देत असल्याने व मुलाखतही रावसाहेब वर्पे यांनीच घेतल्याने त्यांच्यावर संचालक मंडळाच्या बैठकीत कारवाई करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश भालेराव यांनी दिले होते. त्यामुळे संचालक मंडळाच्या सभेत काय होते? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

दरम्यान जवळपास सहा याचिका भरती रद्दच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाखल झाल्या. त्यात बँकेला बाजू मांडण्यास न्यायालयाने सांगितले आहे. त्यासाठी पुढील महिन्यातील तारीख देण्यात आली आहे. त्यामुळे कालच्या संचालक मंडळाच्या सभेत न्यायालयाच्या निर्णयावर चर्चा करण्यात आली. न्यायालय निर्णय देईल त्याप्रमाणे भरती प्रक्रिया पुढील काळात राबविण्यावर संचालकांचे एकमत झाले. मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांच्यावर कारवाई करण्याबाबतही न्यायालयाच्या निर्णयानंतर ठरविण्यात येणार असल्याने वर्पे यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.