Sun, May 26, 2019 20:38होमपेज › Ahamadnagar › राहात्यामध्ये तरुणाचा खून

राहात्यामध्ये तरुणाचा खून

Published On: Apr 15 2018 1:35AM | Last Updated: Apr 15 2018 1:09AMप्रतिनिधी : राहाता

येथील हॉटेल शिवनेरीच्या समोर तरुणाचा खून झाल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. रामदास निधाणे (वय 35) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत शहर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान सदरची घटना उघडकीस आल्यानंतर मयताच्या नातेवाईकांनी हॉटेलजवळ गर्दी करुन नगर-मनमाड महामार्गावर रास्तारोको केला.
याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवार दि. 13 रोजी यातील मयताने त्याचा भाऊ प्रकाश आसाराम निधाने यास दुपारी 12.45 वाजता मोबाईल वरुन फोन करुन कोठे आहेस अशी विचारणा केली होती. मात्र त्यानंतर दुपारी 4.30 वाजता मयत रामदासचे मित्र भाऊसाहेब (मुन्ना) सदाफळ व माजी नगराध्यक्ष साहेबराव निधाने यांनी मोबाईलवरुन फोन करुन रामदास हा हॉटेल शिवनेरी (चितळी रोड-राहाता) येथे  बेशुध्द अवस्थेत पडलेला असल्याचे कळविले.

यानंतर  हॉटेल शिवनेरी येथे गेलो असता रामदासच्या अंगावर अनेक ठिकाणी जखमा आढळून आल्या. डोक्यास पाठीमागील बाजूने मार लागेला होता. याबाबत राहाता पोलिसांना माहिती दिली. फौजदार विशाल वाठोरे व त्यांच्या सहकार्‍यांनी घटनेचा पंचनामा करुन मृतदेह सायं. 6 वा. राहाता ग्रामिण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला.
मयताचे बंधू व अन्य नातेवाईकांनी राहाता येथे शवविच्छेदनास विरोध केल्याने मयत रामदास याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन दि.14 रोजी प्रवरा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात करण्यात आले. यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिल्यानंतर मृतदेहावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रवरा वैद्यकीय महाविद्यालयाच्या वैद्यकीय अधिकार्‍यांच्या मतानुसार मयताचा मृत्यू गळा आवळल्याने झाला असल्याचा प्राथमिक अंदाज असल्याने शिर्डी उपविभागाचे पोलिस उपअधीक्षक डॉ.सागर पाटील, पोलिस निरीक्षक बाळकृष्ण कदम व त्यांच्या सहकार्‍यांनी घटनेचे गांभिर्य लक्षात घेवून खुनाच्या दिशेने तपासाची चक्रे फिरविली आहेत.


Tags :murdur , in rahata ,nagar news