Sun, Apr 21, 2019 01:52होमपेज › Ahamadnagar › आरोपी हजार अन् कोठड्यांची मारामार!

आरोपी हजार अन् कोठड्यांची मारामार!

Published On: Apr 11 2018 1:34AM | Last Updated: Apr 10 2018 11:26PM
नगर : प्रतिनिधी

कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या केडगाव येथील खून प्रकरणात 35-36 आरोपी आहेत. पोलिस अधीक्षक कार्यालयावर झालेल्या हल्ला प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे तीनशेच्या आसपास आरोपी आहेत. तसेच केडगावात पोलिसांवर दगडफेक, रास्तारोको व मृतदेहाची विटंबना केल्याच्या गुन्ह्यात सुमारे 600 शिवसैनिक आरोपी आहेत. एकाच घटनेनंतर दाखल असलेल्या तीन गुन्ह्यातील आरोपींची संख्या सुमारे एक हजारच्या आसपास झाली आहे. त्यामुळे सर्व आरोपी अटक केल्यास त्यांना ठेवायचे कुठे, असा प्रश्‍न पोलिस प्रशासनासमोर पडला आहे.

कोतवाली, तोफखाना, भिंगार कँप, एमआयडीसी, नगर तालुका, सायबर पोलिस स्टेशन, रेल्वे पोलिस स्टेशन, स्थानिक गुन्हे शाखा, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी), केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय), दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) यांच्या ताब्यातील आरोपींना ठेवण्यासाठी एमआयडीसी पोलिस ठाण्यातील कोठडीचा वापर केला जातो. पूर्वी नगर तालुका पोलिस ठाणे, तोफखाना पोलिस ठाण्यातील कोठड्या वापरता होत्या.कोतवाली पोलिस ठाण्याच्या विस्तारित इमारतीतही कोठडीची रचना करण्यात आलेली आहे. नगर तालुका पोलिस ठाण्यातील कोठडी ही बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीने आत्महत्या केल्यापासून बंद करण्यात आली आहे. शहर व परिसरासाठी सुरक्षेच्या कारणास्तवफक्त एमआयडीसी पोलिस ठाण्यातील कोठडी वापरात आहे. या कोठडीत सर्व पोलिस ठाण्यातील कर्मचार्‍यांचा पहारा असतो. एकच कोठडी असल्याने कोठडीतील आरोपींवर लक्ष राहील, असा हेतू आहे. त्यांच्यावर पहार्‍यावरच्या कर्मचार्‍यांसोबत पोलिस अधीक्षक, पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी, नियंत्रण कक्षाकडूनही नजर ठेवता येऊ शकते.

केडगाव खून प्रकरणात आ. जगताप पिता-पुत्र, आ. शिवाजी कर्डिले यांच्यासह 35-36 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यात सध्या चार जण पोलिस कोठडीत आहेत. पोलिस अधीक्षक कार्यालयावर हल्ला केल्याप्रकरणाच्या गुन्ह्यात 34 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. त्यातील 22 जणांना न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे. पण 12 आरोपी पोलिस कोठडीतच आहेत. तोफखानातील रस्तालुटीसह इतर पोलिस ठाण्यातील अनेक आरोपी पोलिस कोठडीत आहेत. त्यामुळे आरोपींना आहे, त्या जागेत झोपेही मुश्किल होऊ लागले आहेत. त्यातच आणखी भर म्हणून केडगाव येथे गोंधळ घालणार्‍या 600 शिवसैनिकांविरुद्ध गुन्हे दाखल आहेत. फक्त तीन गुन्ह्यात एक हजारच्या आसपास आरोपींची संख्या आहेत. आरोपींची धरपकड सुरू आहे. सर्व आरोपींना अटक केल्यास आरोपी कोणत्या कोठडीत ठेवायचे, असा प्रश्‍न पोलिस प्रशासनासमोर आहे. नगरच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडत आहे की, एकाच घटनेशी संबंधित दाखल झालेल्या गुन्ह्यांत एक हजार आरोपी आहेत. गुन्ह्यातील कलमेही सत्र न्यायालयासमोर चालणार्‍या खटल्यांची आहेत. त्यामुळे आरोपीला अटक केली पाहिजे. पण अटक केलेल्या आरोपींना ठेवायचे कुठे, या प्रश्‍नाचे उत्तर प्रशासनासमोर नाही. 

Tags : ahmednagar news, Kedgaon murder, case issue, 35-36 accused,