Thu, Jun 27, 2019 16:41होमपेज › Ahamadnagar › साडेबारा लाख रुपयांचे वाटेकरी अद्याप पसारच 

साडेबारा लाख रुपयांचे वाटेकरी अद्याप पसारच 

Published On: Mar 12 2018 1:03AM | Last Updated: Mar 11 2018 10:48PMनगर : प्रतिनिधी

महापालिकेतील पथदिवे घोटाळ्यातील कामांतून मिळालेली साडेबारा लाखांची रक्कम आरोपी सचिन लोटके याने सबठेकेदार संकेत कराड व अंकुश बोरुडे यांना दिलेली आहे. त्यामुळे गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने त्या दोघांचीही चौकशी करणे आवश्यक आहे. मात्र, ते पसार आहेत. याचा तपासात मोठा अडसर ठरू लागला आहे.

बनावट कामांतून मिळालेल्या रकमेचे वाटेकरीही या गुन्ह्यात आरोपी होतात. बिलांच्या मंजुरीवर सह्या करणारे प्रभारी उपायुक्त विक्रम दराडे, मुख्य वित्त व लेखाधिकारी (कॅफो) दिलीप झिरपे या दोघांना ठेकेदार सचिन लोटके याने लाच दिल्याचा जबाब दिल्यानंतर पोलिसांनी तात्काळ अटक केली. यातील साडेबारा लाख रुपये कराड व बोरुडे यांच्या खात्यावर जमा केल्याचे पोलिस चौकशीतून पुढे आल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे या गुन्ह्याच्या तपासात त्यांचा सहभाग महत्त्वाचा आहे. त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजाविण्यात आलेली आहे, असे तपासी अधिकारी पोलिस निरीक्षक सुरेश सपकाळे यांनी सांगितलेले आहे. मात्र, त्यांची चौकशी अजूनही झालेली नाही. त्यांच्या घरी जाऊन चौकशी केली असता ते सापडत नाहीत. कामानिमित्त बाहेरगावी गेले असल्याचे नातेवाईक सांगत असल्याचे न्यायालयात दाखल केलेल्या ‘रिमांड रिपोर्ट’ मध्ये नमूद करण्यात आलेले आहे. तरीही दोघेही अद्याप हाती लागलेले नाहीत. त्यांची चौकशी करणे या गुन्ह्यात अत्यावश्यक आहे.

विक्रम दराडे याच्या बिलांवर सह्या आहेत. त्यामुळे गुन्ह्यात तो आरोपी असणे आवश्यक होते. जशा दराडे यांच्या सह्या आहेत, तशाच सह्या उपायुक्त राजेंद्र चव्हाण यांच्याही आहेत. त्यामुळे चव्हाण यांना फौजदारी प्रक्रिया संहितेनुसार नोटीस बजावून तपासी अधिकारी पोलिस ठाण्यात बोलावू शकतात. चव्हाण यांची चौकशी गुन्ह्यात दराडे याच्याइतकीच महत्त्वाची आहे. चौकशीसाठी आवश्यक असलेले संबंधित आता गुन्ह्याच्या तपासात आवश्यक ठरू लागले आहेत.