Sat, Mar 23, 2019 12:37होमपेज › Ahamadnagar › मुळा नदीवरील पुलाची दुरवस्था

मुळा नदीवरील पुलाची दुरवस्था

Published On: Jan 16 2018 2:08AM | Last Updated: Jan 15 2018 10:14PM

बुकमार्क करा
वळण : वार्ताहर

वळण, पिंप्री-वळण येथे मुळा नदीवर असलेल्या मोठ्या पुलाच्या कामाला जागोजागी खड्डे पडले आहेत. तीन ते चार ठिकाणी पुलावरील स्टील उघडे पडले आहे. त्याचप्रमाणे संरक्षक कठड्याचे अँगल व पाईपही तुटून गायब झाले आहेत. एकंदरीत या पुलाची दुरवस्था वाढत चालली असून, पुलावरील रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित दखल घेऊन दुरुस्ती करावी, अन्यथा भविष्यात पुलाला धोका उद्भवण्याची शक्यता आहे.

सप्टेंबर 2001 मध्ये वळण, पिंप्री-वळण येथे मुळा नदीवर हुडको 17670 या योजनेंतर्गत सुमारे 85.76 लाख रुपये खर्चाच्या पुलास प्रशासकीय मान्यता मिळाली. राहुरीचे तत्कालिन आ. प्रसाद तनपुरे यांना या भागातील ग्रामस्थांचा या ठिकाणी पावसाळ्यात व अन्य वेळीही नदीच्या पाण्यामुळे वळण,पिंप्री-वळण व चंडकापूर या गावांचा संपर्क तुटायचा. त्यामुळे या भागातील कापूस, ऊस, नगदी पिके, भाजीपाला आदी शेतीमाल तालुक्याच्या ठिकाणासह अन्य ठिकाणी नेण्यास अडचण येत होती. अशावेळी दूरवरून केंदळ मार्गे जावे लागत असे. विद्यार्थ्यांचेही अतोनात हाल होत असे. यासाठी ग्रामस्थांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे तनपुरे यांनी पुलाच्या कामास निधी उपलब्ध केला. त्यास सप्टेबर 2001 ला तांत्रिक मान्यता मिळाली व एप्रिल 2002 ला प्रत्यक्ष कामास सुरुवात होऊन ऑक्टोबर 2003 मध्ये काम पूर्ण करण्यात आले.

हा पूल आरसीसी सॉलीड पियर्स, सॉलीड स्लॅबमध्ये 10 मीटरचे 12 गाळे याप्रमाणे 120 मीटर. लांबीचा ओपन फाउंडेशन, 7.50 मीटर रुंदी व सरासरी 5.50 मीटर उंचीचा बांधण्यात आला आहे. त्यात 730 मिमी. जाडीचा आरसीसी डेक स्लॅब व 75 मिमी. जाडीचा (सुपरस्ट्रक्चर) आरसीसी वेअरिंग कोट करण्यात येऊन संरक्षक कठडे हे डिसकंट्युनिअर्स कर्ब, अँगल व पाईपचे असून जोड रस्ता हा वळण बाजूने 400 मीटर, पिंप्रीवळण बाजूनेही 400 मीटर लांबीचा आहे. सध्या पुलाची सध्या दुरवस्थेकडे वाटचाल असून याकडे संबंधित खात्याचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. कारण महिन्यापासून संरक्षक कठड्याचे अँगल व पाईप निघाले आहेत. ते पुन्हा उभे करण्यात आले नाहीत. पुढे ते अँगल व पाईपच गायब झाले. उजव्या बाजूकडील जवळ एक तृतियांंश कठडेच नसल्याने पुलावरून जाणारे विद्यार्थी, लहान मुले हे पिंप्रीतून वळणला प्राथमिक, माध्यमिक शाळेला पायी चालत, सायकलने ये-जा करत असतात. या मुलांचा तोल जाऊन नदीत पडण्याचा धोका संभवतो. तसेच पावसाळ्यात मुळा नदीला पाणी असते. अशा वेळीही मोठ्या प्रमाणात धोका असतो. सध्या तरी पुलावर टाकण्यात आलेल्या स्लॅबचे स्टील तीन ते चार ठिकाणी पूर्ण उघडे पडले आहेत. त्या ठिकाणी खड्डे झाले आहेत. असे खड्डे आणि स्टिल उघडे पडल्याने एकंदरीत पुलाला घरघर लागली आहे. असे असतानाही संबंधित खात्याला याची खबर नाही की कोणी अद्यापि दखल घेतली नाही. त्यामुळेच पुलाची दुरवस्था झाली आहे.
 याप्रश्‍नी सार्वजनिक बांधकाम खात्याने दखल घेऊन या पुलाची त्वरित दुरुस्ती करणे अपेक्षित आहे. अन्यथा लाखो रुपये खर्च पाण्यात जाण्यास वेळ लागणार नाही.