Sat, Jun 06, 2020 07:55होमपेज › Ahamadnagar › मुळा धरणाच्या बंधार्‍यांना गळती 

मुळा धरणाच्या बंधार्‍यांना गळती 

Published On: Apr 28 2018 1:41AM | Last Updated: Apr 28 2018 1:22AMराहुरी : प्रतिनिधी

तालुक्यातील मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून बंधार्‍यांसाठी सुरू असलेला विसर्ग नुकताच बंद करण्यात आला. मात्र, नदीपात्रातील बंधारे पूर्ण क्षमतेने भरलेले नाही, तसेच या बंधार्‍यांना गळती लागल्याने साठवलेले पाणीही फार काळ टिकणार नसल्याने नदीकाठचा शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. 

मुळा धरणातून पाच बंधार्‍यांसाठी थेट मोर्‍यातून पाणी सोडण्यात आले होते़  मात्र, 14 हजार दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक राहिल्याने नदीपात्रात पडणारे पाणी आपोआप बंद झाले होते़ त्यानंतर पाच दिवसांपूर्वी मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याचा प्रयोग करण्यात आला होता. सडे येथील एस्केपद्वारे हे पाणी देव नदीत वळविण्यात आले होते. मुळा नदीतून सोडण्यात आलेल्या पाण्याने वांजूळपोई बंधार्‍यापयर्ंतचा 28 किलोमीटरचा प्रवास केला़

दरम्यान, मुळा धरणातील 156 दशलक्ष घनफूट पाण्यापैकी बरेच पाणी बाष्पीभवन व नासाडीमुळे बंधार्‍यात पोहोचू शकले नाहीत़ मानोरी, मांजरी व वांजूळपोई बंधार्‍यात चार फळ्या टाकल्या. मात्र, पुरेसे पाणी बंधार्‍यात न पोहोचल्याने बंधारे खपाटीलाच राहिले आहेत. बंधार्‍यात प्रत्यक्षात किती पाणी पोहोचले? हे पाटबंधारे खात्याला देखील माहिती नाही़  त्यामुळे नदीकाठच्या शेतकर्‍यांच्या शेतीचा पाणीप्रश्‍न कायमस्वरूपी सुटण्याची चिन्हे नाहीत़

मुळा नदीपात्रातील बंधार्‍याच्या फळ्या हा विषय कायम चिंतेची बाब बनली आहे़  फळ्या कालबाह्य झाल्याने लिकेजमधून पाणी वाहून जाते़ त्यामुळे बंधार्‍याचा पाणी साठवण हा मूळ हेतू दूर गेला आहे.़ मांजरी येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधार्‍याला गळती सुरू असल्याचे प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर आढळून आले.़ मानोरी बंधाराही गळतीला अपवाद नाही़  त्यामुळे या बंधार्‍यात पाणी साठवणूही ते प्रत्यक्षात किती काळ टिकेल? याविषयी शेतकर्‍यांमध्ये चिंता आहे. पाटबंधारे विभागाने तात्काळ फळ्यांची दुरुस्ती करून ही बंधारे पूर्ण क्षमतेने भरून देण्याची मागणी नदीकाठचा शेतकरी करताना दिसत आहे. 

चार्‍यांची दुरुस्तीअभावी पाण्याचा अपव्यय

मुळा धरणात 11 हजार 454 दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे़  4500 दशलक्ष घनफूट मृतसाठा आहे़  याशिवाय पिण्यासाठी व उदयोगधंद्यासाठी पाणी देणे आहे़ उन्हाची तीव्रता वाढल्याने बाष्पीभवनाचे प्रमाण वाढले आहे़  मुळा उजव्या कालव्यातून शेतीसाठी 5000 तर डाव्या कालव्यातून 500 दशलक्ष घनफूट पाणी लागणार आहे़  कालव्यांची दयनीय अवस्था व चार्‍यांची वेळेवर दुरुस्ती होत नसल्याने निम्मे पाणी वाया जात आहे.