Sun, Apr 21, 2019 04:36होमपेज › Ahamadnagar › मुनगंटीवार यांचा खडसेंना टोला !

मुनगंटीवार यांचा खडसेंना टोला !

Published On: Mar 25 2018 1:44AM | Last Updated: Mar 25 2018 1:44AMशिर्डी : प्रतिनिधी

मंत्रालयात उंदीर घोटाळा झाल्याचे सांगत स्वपक्षालाच अडचणीत आणणारे माजीमंत्री एकनाथ खडसे यांना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नाव न घेता अप्रत्यक्षपणे टोला लगावला. एखाद्या गोष्टीचा चुकीचा अर्थ काढून आरोप करणार्‍यांना साईबाबा सद्बुद्धी देवो, असे साकडे घातल्याचेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

वित्तमंत्री मुनगंटीवार यांनी काल शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेतले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, मंत्रालयात कागदपत्रांच्या फायली कुरतडू नयेत, म्हणून उंदीर मारण्यासाठी औषधे ठेवण्यात आली होती. अशा चार लाख गेाळ्या ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे तेवढे उंदीर मेले, असा चुकीचा अर्थ काढून आरोप केले जात आहेत. त्यामध्ये किती औषधे दिली? किती उंदीर मेले? त्याची विल्हेवाट कशी लावली? असे निरर्थक प्रश्न विचारले जात आहेत. आधीच व्यवस्थेवरील जनतेचा विश्‍वास कमी होत आहे. अशा बेजबाबदार विधानांनी तो आणखी कमी होईल, असे ते म्हणाले. 

याप्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे, संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, भाजपा जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, शहराध्यक्ष शिवाजी गोंदकर, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष सचिन तांबे, रवींद्र गोंदकर, मुख्य कार्यकारी अधिकारी रूबल अग्रवाल आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.

अण्णा हजारे यांच्या आंदोलनाबाबत ना. मुनगंटीवार म्हणाले की, मागण्यांबाबत त्यांची सरकारकडून अपेक्षा योग्य आहे. मात्र, या मागण्या काँगे्रसने 47 वर्षांच्या सत्तेत पूर्ण केल्या नाहीत. 

साडेतीन वर्षांत आम्ही त्या पूर्ण कराव्यात, अशी त्यांची अपेक्षा असल्याने, त्यांचा आमच्या सरकारवर विश्वास आहे. त्यामुळे अण्णांनी केलेल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकार प्रयत्न करील.

कर्जमाफी न मिळालेल्या शेतकर्‍यांना ती मिळण्यासाठी राज्य सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात 10 हजार कोटींची तरतूद केली आहे. सरकारी कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग बक्षी समितीचा अहवाल सादर होताच लागू करण्यात येणार आहे. 18 लाख कर्मचार्‍यांना त्याचा लाभ मिळेल. 

काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात राज्यावर असलेला कर्जाचा डोंगर कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले.  मागील सरकारच्या तुलनेत आम्ही राज्यावरील कर्ज वाढवले नाही.  मात्र इतर राज्याच्या ऋणभाराच्या तुलनेत कर्ज निश्‍चितच कमी झाले आहे. महसूली तूटही 54 टक्क्यापर्यंत खाली आली असून, येत्या दहा वर्षांत ती शून्य टक्क्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न राहणार आहे. कर्जाचा बोजा जास्त दिसत असला तरी राज्याचे उत्पन्न वाढले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

Tags :ahmadnagar, mouse Scam, in Ministry, Finance Minister Sudhir Mungantiwar, Commentary,