Thu, Jun 27, 2019 18:21होमपेज › Ahamadnagar › पीडितेच्या मातेला शोकावेग अनावर

पीडितेच्या मातेला शोकावेग अनावर

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

नगर : प्रतिनिधी

निकालानंतर पीडितेची आई व इतर नातेवाईक महिलांना अश्रूंना आवर घालता आला नाही. न्यायालय इमारतीच्या बाहेर आल्यानंतर त्यांनी हंबरडा फोडला. निकालामुळे सकाळी साडेआठ वाजल्यापासूनच जिल्हा व सत्र न्यायालय परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. सकाळी नऊ वाजल्यापासून न्यायालय परिसरात गर्दी झाली होती. 10 वाजताच न्यायदान कक्ष गर्दीने भरला होता. न्यायदान कक्षातील पहिल्या रांगेत पीडित मुलीची आई व इतर नातेवाईक बसले होते. सकाळी 11 वाजून 10 मिनिटांनी अ‍ॅड. निकम हे न्यायदान कक्षात दाखल झाले. 11 वाजून 22 मिनिटांनी न्या. केवले या न्यायदान कक्षात दाखल झाल्या.

निकम यांनी आरोपींचे वकील येणार नसल्याचा निरोप न्यायालयास दिला. त्यानंतर न्यायालयाने आरोपींना समोर बोलावून घेतले. आरोपींची नावे वाचून त्यांना विविध कलमांन्वये तीन वर्षे सक्तमजुरी, दंड, जन्मठेप व मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली. आरोपींना उच्च न्यायालयात अपील करता येईल. आरोपींना निकालाची प्रत सायंकाळपर्यंत देण्यात येईल, असे न्यायालयाने सांगितले. त्यानंतर न्या. केवले या न्यायदान कक्षातून निघून गेल्या. दरम्यान, बुधवारी शिक्षेच्या दिवशी आरोपींचे वकील न्यायालयात अनुपस्थित राहिले. घटनेची पार्श्‍वभूमी  कर्जत तालुक्यातील कोपर्डी शिवारातील तुकाई लवणवस्ती परिसरात 13 जुलै 2016 रोजी सायंकाळी नववीत शिकणारी शाळकरी मुलगी आजोबांच्या घरी मसाला आणण्यासाठी गेली होती.

घरी येत असताना तिला रस्त्यात अडवून पप्पू शिंदे याने सायकलवरून खाली ओढले. तिने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिंदे याने तिला रस्त्यापासून काही अंतरावरील झाडाखाली ओढत नेले. तिची सायकल, मसाला व चपला चारीतच पडल्या होत्या. झाडाखाली तिच्या अंगावरील सर्व कपडे काढून तिचे अंग, ओठ, छाती, पाठीवर चावे घेतले. पीडितेने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने तिचे हात मोडून टाकले होते. त्यानंतर पुन्हा पीडितेला नग्न अवस्थेतच उचलून रस्त्याच्या दुसर्‍या बाजूला असलेल्या लिंबाच्या झाडाखाली नेले. तेथे शारीरिक अत्याचार करून गळा आवळून तिचा निर्घृण खून केला.

आरोपी शिंदे हा तेथे उभा असतानाच पीडिता घरी पोहोचलेली नसताना तिची आई, चुलतभाऊ व इतर नातेवाईक तिचा शोध घेत होते. त्यांना पाहताच मुख्य आरोपी शिंदे तेथून पळून जाऊ लागला. पीडितेच्या चुलतभावाने त्याचा पाठलाग केला. परंतु, तो ज्वारीच्या शेतातून पसार झाला. नातेवाईकांनी पीडित मुलीला कुळधरण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता, ती मृत असल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी स्पष्ट केले. घटनेच्या दुसर्‍या दिवशी मुख्य आरोपी पप्पू शिंदे याला पोलिसांनी श्रीगोंदा येथून ताब्यात घेतले.

एकटा आरोपी इतक्या क्रूर पद्धतीने गुन्हा करू शकत नसल्याने या गुन्ह्यात आणखी आरोपींचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना होता. काही साक्षीदारांनी शिंदे याच्यासोबत आणखी दोघांना घटनेच्या दिवशी रस्त्यावर पाळत ठेवताना पाहिले होते. तसेच घटनेच्या दोन दिवस आधीच तिघांनी दुचाकीवरून येऊन पीडितेला रस्त्यावर अडवून तिची छेड काढल्याचे तिच्या वर्गमैत्रिणीने सांगितले होते. त्यावरून पोलिसांनी संतोष भवाळ व नितीन भैलुमे या दोघांनाही अटक केली. पोलिस निरीक्षक शशिराज पाटोळे यांनी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. तपासात मुख्य आरोपी शिंदे याने पीडितेवर शारीरिक अत्याचार करून तिचा निर्घृण खून केला, तर इतर दोघांनी त्याला प्रोत्साहन दिल्याचे स्पष्ट झाले होते.

 दुर्मिळातील दुर्मीळ गुन्हा दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर आरोपींवर कट रचून बलात्कार व खून केल्याचा आरोप ठेवण्यात यावा, अशी मागणी निकम यांनी केली होती. न्यायालयाने कटाच्या आरोपात तिघांनाही दोषी ठरविले. आरोपींनी केलेला गुन्हा हा दुर्मिळातील दुर्मीळ असल्याने आरोपींना फाशीचीच शिक्षा द्यावी, अशी मागणी अ‍ॅड. निकम यांनी केली होती. कटातील आरोपींनाही फाशी देता येते, हे स्पष्ट करणार्‍या इंदिरा गांधी हत्या व संसद हल्ल्याच्या खटल्यांचाही संदर्भ न्यायालयात दिला होता.