Thu, Sep 20, 2018 12:14होमपेज › Ahamadnagar › मोहिनीराज यात्रेची आज सांगता

मोहिनीराज यात्रेची आज सांगता

Published On: Feb 06 2018 1:43AM | Last Updated: Feb 06 2018 1:00AMनेवासा : प्रतिनिधी 

नेवासा नगरीचे ग्रामदैवत व लाखो भाविकांचे कुलदैवत असलेल्या भगवान विष्णूंच्या स्त्री रूप असलेल्या श्री मोहिनीराजांच्या यात्रेनिमित्त लाखो भाविकांनी दर्शन घेतले. यात्रेनिमित्त सायंकाळी 6 वाजता मंदिरासमोर काल्याची दहीहंडी फोडण्यात आली. यावेळी हजारो भाविक काला घेण्यासाठी उपस्थित होते काल्याप्रसंगी भाविकांनी रेवड्यांची उधळण केली.
रथसप्तमी पासून ग्रामदेवता श्री मोहिनीराजांच्या पंधरा दिवशीय यात्रा महोत्सवास प्रारंभ झाला होता. काल, दि.5 फेब्रुवारीस यात्रेचा मुख्य दिवस होता. यादिवशी प्रवरा नदीजवळ असलेल्या श्री मोहिनीराज मंगल कार्यालयातून उत्सवमूर्तीची पूजा होऊन उत्सवमूर्ती पालखीत ठेऊन मिरवणूक काढण्यात आली. मानाप्रमाणे न्यायाधीशांच्या हस्ते उत्सवमूर्तीच्या पालखीचे पूजन करण्यात आले. सकाळी गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी उत्सवमूर्तीचे पूजन करून दर्शन घेतले.

  पालखी वाजत गाजत गुलालाची उधळण करत मुख्य मंदिराकडे आली.  बोल मोहिनीराज की जयअसा जयघोष करण्यात येऊन उत्सवमूर्ती मुख्य मंदिरात नेण्यात आली. परंपरेनुसार मानाची दहीहंडी बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते फोडण्यात आली. यावेळी आ. बाळासाहेब मुरकुटे,  राजेंद्र मापारी, काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय सुखधान, भाजपचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे, कृष्णा डहाळे यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दहीहंडी फोडल्यानंतर रेवड्याची उधळण करून करण्यात आली. आ. मुरकुटे मित्र मंडळ, संजय सुखधान, गोल्डन ग्रुप यांच्या वतीने सामुदायिक काल्याचे भाविकांना वाटप करण्यात आले. देशपांडे गल्लीमध्ये घरोघरी काल्याच्या प्रसादाचे वाटपाचे आयोजन करण्यात आले होते. श्री मोहिनीराज मंदिरापासून डॉ. हेडगेवार चौक,मुख्य पेठ,नगरपंचायत चौकापर्यंत खेळणी मेवामिठाई,सौंदर्य प्रसाधने यांची मोठ्या प्रमाणात दुकाने थाटण्यात आली होती. बाजारतळ परिसरात रहाटपाळणे लहान मुलांच्या मनोरंजनाची साधने यात्रेकरूंची मनोरंजन करणारी ठरली.
रात्री पालखीतून उत्सवमूर्ती ग्रामप्रदक्षिणेसाठी निघाली असता मारुती चौकासह मुख्य पालखी मार्गावर पालखीचे पंचारती ओवाळून सुवासींनीनी औक्षण तर भाविकांनी फटाक्यांची आतिषबाजी व तोफांच्या सलामीने स्वागत केले. आज दि.6 फेब्रुवारी रोजी कुस्त्यांच्या हगाम्याने पंधरा दिवस चाललेल्या यात्रोत्सवाची सांगता होणार आहे.