Tue, Jul 16, 2019 01:37होमपेज › Ahamadnagar › उसतोडणी कामगारांचे नेते दगडू पाराजी बडे यांचे निधन

उसतोडणी कामगारांचे नेते दगडू पाराजी बडे यांचे निधन 

Published On: Jun 15 2018 8:28PM | Last Updated: Jun 15 2018 8:26PMपाथर्डी : प्रतिनिधी

उसतोडणी कामगारांचे नेते व माजी आमदार दगडू पाराजी बडे (वय ८०) यांचे शुक्रवारी सायंकाळी  दुःखद निधन झाले. पत्नी शिलाबाई, मुले कल्याण व धनंजय आणि चार मुली असा परिवार आहे. उसतोडणी कामगारांना संघटीत करण्याची सुरुवात १९८० साली बडे व माजी मंत्री बबन ढाकणे यांनी केले. भारतीय जनता पक्षाचे पाथर्डी मतदार संघात कमळ फुलविण्याचे काम पहिल्यांदा दगडू बडे यांनी केले. उपेक्षीत असणारा तोडणी कामगारांचे संघटन करुन त्यांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करण्याचे काम केले. वडगाव येथील बेलपारा मध्यम प्रकल्पात जमिनी गेलेल्या शेतकर्‍यांना सरकारकडून नुकसान भरपाई मिळावी यासाठी रस्त्यावर उतरुन संघर्ष केला. गावचे पोलिसपाटील पदापासून सुरुवात केली. त्यानंतर सामाजिक कामात सातत्याने पुढे राहणारे बडे यांनी १९९९ साली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची उमेदवारी केली. 

माजी मंत्री बबन ढाकणे व दिवंगत माजी आमदार राजीव राजळे यांचा पराभव करुन ते विधानभवनात गेले होते. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे भाचे रमेश कराड व दगडू बडे यांची मुलगी यांचा विवाह झाल्यानंतर मुंडे यांचे ते जवळचे नातेवाईक बनले होते. बबन ढाकणे यांचे दिवंगत चिरंजीव राजेंद्र ढाकणे यांना बडे यांची मुलगी दिल्याने ते ढाकणेंचे व्याही बनले. 

बडे यांना शुक्रवारी दुपार नंतर छातीमधे दुखू लागल्याने अहमदनगर य़ेथे खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार दरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली. 
गेल्या सहा महिन्यांपासुन ते आजारी होते. नगर व पुणे येथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते. चिचंपूर पांगुळ गावचे सरपंच धनंजय बडे व औरंगाबाद उच्च न्यायालयात वकील असणारे कल्याण बडे हे दोघे त्यांचे पुत्र होत.