Wed, Apr 24, 2019 21:50होमपेज › Ahamadnagar › एकच ‘मिशन’ अकरावी ‘अ‍ॅडमिशन’!

एकच ‘मिशन’ अकरावी ‘अ‍ॅडमिशन’!

Published On: Jun 10 2018 1:47AM | Last Updated: Jun 09 2018 11:23PMनगर : प्रतिनिधी

दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी व पालकांनी अकरावीसाठीच्या प्रवेश प्रक्रियेकडे मोर्चा वळविला आहे. अकरावीच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे, महाविद्यालयांची निवड करणे, अर्ज घेणे यासाठी विद्यार्थी, पालकांची धावपळ सुरु झाली असून, यंदा जिल्ह्यात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपेक्षा तीन हजार जागा कमी असल्याने पालकांची ‘डोकेदुखी’ वाढणार आहे.

अकरावीच्या प्रवेशासाठी जिल्ह्यात यंदा 63 हजार जागा उपलब्ध आहेत. त्यापैकी नगर शहरात 9 हजार जागा आहेत. यावर्षी जिल्ह्यात 76 हजार 219 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी 65 हजार 787 विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. उपलब्ध जागा व उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पाहता जवळपास 3 हजार जागा यंदा कमी आहेत. विज्ञान व वाणिज्य शाखा तसेच विशिष्ट महाविद्यालयाकडे विद्यार्थ्यांचा कल असल्याने प्रवेशासाठी विद्यार्थी व पालकांचा कस लागणार आहे.

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. ऑनलाईन पद्धतीने निकाल जाहीर झाला असल्याने प्रत्यक्षात निकाल हाती येण्यासाठी विद्यार्थ्यांना काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. निकाल हाती पडताच अकरावीसह अन्य व्यवसायिक कोर्सला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी व पालकांची मोठी धावपळ उडणार आहे. दहावीसाठी जिल्ह्यातून 76 हजार 219 विद्यार्थी बसले होते. शहरासह जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील 715 तुकड्यांमधून 63 हजार 520 प्रवेश विद्यार्थ्यांना दिला जाईल.
शहरी व ग्रामीण भागातील 171 केंद्रांवर दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. नगर शहरात सर्वाधिक 8 हजार विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. दहावीच्या गुणांवरच अकरावीच्या कुठल्या शाखेत प्रवेश घ्यायचा ते विद्यार्थी व पालक ठरवत असतात. कला शाखेच्या सर्वाधिक 29 हजार 520 जागा आहेत. त्यासह विज्ञान शाखेच्या जिल्ह्यात 24 हजार  जागा असून, वाणिज्य शाखेच्या सर्वात कमी 7 हजार 960 जागा आहेत.