Mon, Jul 15, 2019 23:43होमपेज › Ahamadnagar › दगडफेक झाल्याने तणाव

दगडफेक झाल्याने तणाव

Published On: Jan 05 2018 1:04AM | Last Updated: Jan 04 2018 10:11PM

बुकमार्क करा
मिरजगाव : वार्ताहर

कोरेगाव भीमा येथील घटनेच्या निषेधार्थ मिरजगाव येथे कडकडीत बंद पाळून नगर-सोलापूर महामार्गावरील क्रांती चौकात रास्तारोको आंदोलन करण्यात आले. तहसीलदार किरण सावंत व कर्जत पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक वसंत भोये यांना यावेळी निवेदन देण्यात आले. आंदोलन मागे घेण्यात आल्यानंतर एसटी बसवर दगडफेक करण्यात आल्याने काहीकाळ तणावाचे वातावरण बनले होते. 

कोरेगाव भीमा येथे दलितांवर हल्ला झाला. त्याच्या निषेधार्थ बुधवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. मात्र बुधवारी मिरजगावचा आठवडे बाजार असल्याने मिरजगाव येथील दलित संघटनांनी काल बंद पाळला.काल सकाळपासूनच गावात बंद पाळण्यात आला. यावेळी अत्यावश्यक सेवा वगळता मिरजगावमधील सर्व व्यापार्‍यांनी आपली दुकाने बंद ठेवली होती. यावेळी गावातून दलित संघटनांनी निषेधाच्या घोषणा देत फेरी काढली. त्यानंतर मिरजगावमधील क्रांती चौकात नगर-सोलापूर महामार्गावर रास्तारोको करण्यात आला.

यावेळी दलित बांधवांवर हल्ला करणार्‍यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, तसेच दलितांवर होणारे अत्याचार शासनाने त्वरित थांबवावेत, अशा मागण्या करण्यात आल्या. यावेळी अमोल देवळे, सरस्वती घोडके, आशा घोडके, सारंग घोडेस्वार, भगवान घोडके, अमोल शिरसाठ, सुनील घोडके, विशाल घोडके, कुलदीप गंगावणे, मंगेश घोडके यांची भाषणे झाली. 

तहसीलदार किरण सावंत व कर्जत पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक वसंत भोये यांच्याकडे मागण्यांचे निवेदन देण्यात आले. पोलिस निरीक्षक भोये, पोलिस उपनिरीक्षक शहादेव पालवे यांनी यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवला होता. मोर्चा संपल्यानंतर नगर-सोलापूर महामार्गावर एक एसटी बसची काच फोडण्यात आली. त्यामुळे काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे शाळकरी मुलांचे हाल झाले. सायंकाळनंतर जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले.