होमपेज › Ahamadnagar › शिर्डीमध्ये बाबांचा चमत्‍कार?; साई प्रतिमा प्रकटल्‍याचा भक्‍तांचा दावा

शिर्डीमध्ये बाबांचा चमत्‍कार?; साई प्रतिमा प्रकटल्‍याचा भक्‍तांचा दावा

Published On: Jul 12 2019 2:46PM | Last Updated: Jul 12 2019 2:24PM
नगर : पुढारी ऑनलाईन

देव हा या सृष्‍टीच्या कनाकनात वास करतो असे म्‍हणतात. आज (ता.१२) शिर्डीमध्ये साईभक्‍तांनी एक चमत्‍कार पाहिल्याचा दावा केला. काही लोकांच्या दृष्‍टीने हा डोळ्‍यांना झालेला भ्रम असेल, मात्र साई बाबांचे भक्‍त याला बाबांचा चमत्‍कार मानत आहेत. त्‍यामुळे आज शिर्डीमध्ये आलेला प्रत्‍येक भक्‍त साईबाबांचे दर्शन घेतल्‍यानंतर ज्‍या भिंतीवर साईबाबांची प्रतिमा दिसली. त्‍या भिंतीचे दर्शन घेण्यासाठीही भाविकांनी गर्दी केल्‍याचे दिसून आले. 

आज आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर सारी पंढरी लाखो वारकर्‍यांनी दुमदुमली असताना, शिर्डीमध्येही साईभक्‍तांनी आज साई दर्शनासाठी गर्दी केली. त्‍यात साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्‍या भक्‍तांनी मंदिरातील एका भिंतीवर साईबाबांची प्रतिमा दिसल्‍याचा दावा केला. गेल्‍या वर्षी १२ जुलै रोजीच द्वारकामाईद्‌मंदिरात भक्‍तांनी साईबाबांची प्रतिमा दिसल्‍याचे सांगितले होते. वर्षभरानंतर काल गुरूवारी रात्री साडेअकराच्या सुमारास पुन्हा द्वारकामाईत त्‍याच भिंतीवर भक्‍तांनी साईबाबांची प्रतिमा दिसल्‍याचा दावा केला. यामुळे मंदिरात भाविकांनी साईबाबांच्या दर्शनानंतर या भिंतीचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली. 

भाविकांची इतकी गर्दी झाली की, मंदिरामध्ये लांबच लांब रांगा लागल्‍या. यावेळी काही भक्‍तांनी या भिंतीवर साईबाबांची प्रतिमा टिपण्यासाठी गर्दी केली. यानंतर ही घटना सोशल मीडियातून वार्‍यासारखी सगळीकडे पसरली. यामुळे आज सकाळपासून मंदिरात भाविकांनी गर्दी केली. अनेक भक्‍त बाबांच्या भजन आणि किर्तनात दंग आहेत. 

शिरडीच्या द्वारकामाई मंदिरात साईबाबांनी आपल्‍या जीवनातील ६० वर्षे घालवली. अनेक भक्‍तांची धारणा आहे की, या ठिकाणी साईबाबा भक्‍तांना चमत्‍काराची प्रचिती देतात. साईबाबांचे आयुष्‍यच चमत्‍कारांनी भरलेले आहे. त्‍यामुळे आजही साईभक्‍तांची श्रध्दा आहे की, शिर्डी साई मंदिरात येणार्‍या भक्‍तांची प्रार्थना साईबाबा ऐकतात आणि आपले मागणे पूर्ण करतात. त्‍यामुळे साईबाबांच्या विषयी साईभक्‍तांमध्ये इतकी अपार श्रध्दा आहे की, साईभक्‍तांना साईबाबा हे प्रत्‍येक ठिकाणी दिसतात.