Sun, Jul 12, 2020 15:10होमपेज › Ahamadnagar › हळदीच्या दिवशीच झाला नवरदेवाचा घातपाती मृत्यू

हळदीच्या दिवशीच झाला नवरदेवाचा घातपाती मृत्यू

Published On: May 06 2018 1:06AM | Last Updated: May 05 2018 11:21PMकोपरगाव : प्रतिनिधी

गेल्या दोन दिवसांपासून घरातून बेपत्ता झालेल्या तालुक्यातील ब्राम्हणगाव येथील रहिवासी सतीश वेणूनाथ वाकचौरे (वय 26) याचा मृतदेह खिर्डी गणेश शिवारातील एका विहिरीत सापडल्याने त्याचा घातपात झाला असल्याची शंका कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे. आज  रविवारी (दि.6) मयत सतीशचे लग्न होते. हळदीच्या दिवशी सदरची दुःखद घटना समोर आल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. 

तालुक्यातील ब्राम्हणगाव येथील रहिवासी असलेला सतीश हा गेल्या दोन दिवसांपासून घरातून बेपत्ता झाला होता. त्याच्या कुटुंबीयांनी कोपरगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली होती. तसेच सतीश ज्या गाडीवर बाहेर पडला ती गाडी व  त्याचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले होते. 

दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून त्याचा पोलिस व कुटुंबीय शोध घेत होते. मात्र, सतीशकडे असलेला मोबाईल बंद असल्याने तपासात अडचणी निर्माण होत होत्या. अखेर दि. 5  मे रोजी सकाळी  खिर्डी गणेश शिवारातील एका शेतातील विहिरीजवळ सतीशची दुचाकी काही जणांना दिसून आली. त्यांनी व्हॉटसअ‍ॅपवरील गाडी नंबर तपासाला असता तो सतीशच्या गाडीचा निघाला. तसेच शेजारील विहिरीत सतीशचे प्रेत तरंगत असताना आढळून आल्याने त्यांनी मयत सतीशच्या कुटुंबीयांना माहिती दिली. 

मयत सतीशचे कुटुंबातील सदस्य घटनास्थळी आले असता सदरचे प्रेत पाहून त्यांना धक्का बसला.गेल्या पंधरा दिवसापूर्वी मयत सतीशचा वैजापूर तालुक्यातील महालगाव येथे साखरपुडा झाला होता. दि. 5 मे रोजी त्याच्या हळदीचा कार्यक्रम व आज 6 मे रोजी लग्न होते. मात्र, त्याच्या सर्व स्वप्नावर पाणी फेरले गेले. अखेर त्याचा मृतदेह सापडल्याने यावरून उलटसुलट चर्चा सुरू असून सतीशचा घातपात झाला असल्याची शक्यता त्याच्या घरच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली असल्याची माहिती पुढे येत आहे. कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. सतीश हा त्याच्या आई व वडीलांचा एकुलता एक मुलगा होता. त्यास दोन बहिणी देखील आहेत. ऐन लग्नाच्या आदल्या दिवशी वाकचौरे कुटुंबीयावर शोककळा पसरली असून रात्री उशिरा पर्यंत पोलिस ठाण्यात कुठलीही तक्रार दाखल झालेली नव्हती.