Mon, Mar 25, 2019 13:12होमपेज › Ahamadnagar › लाखो भाविकांकडून मच्छिंद्रनाथांचे दर्शन

लाखो भाविकांकडून मच्छिंद्रनाथांचे दर्शन

Published On: Jan 17 2018 1:55AM | Last Updated: Jan 16 2018 10:18PM

बुकमार्क करा
मढी : वार्ताहर 

नाथ संप्रदायाचे आद्य मच्छिंद्रनाथांच्या संजीवनी समाधी सोहळ्यास मायंबा (ता. आष्टी) येथे प्रारंभ झाला असून, लाखो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. मंदिर परिसर नाथांच्या जयजयकाराने दुमदुमुन गेला होता.

मच्छिंद्रनाथ गडावर कालपासून (दि.16) सोहळ्यास प्रारंभ झाला. या महोत्सवाची सांगता शुक्रवारी धर्मनाथ बीज उत्सवाने होणार आहे. मच्छिंद्रनाथांनी पौष अमवस्येच्या दिवशी संजीवन समाधी घेतली. त्यामुळे दरवर्षी या दिवशी राज्यभरातून लाखो नाथ भक्त येथे दर्शनाला येतात. नाथांनी समाधी घेण्यापूर्वी काहीकाळ सावरगाव येथे वास्तव केले. त्यावेळी त्यांनी भिक्षा मागून शुद्ध तुपात रोट बनविले होते. त्यामुळे आजही प्रसादासाठी रोट बनविण्याची परंपरा कायम आहे. यात्रेपूर्वी गावातून शिधा जमा करून गडावरील देव तलावाजवळ रोट तयार केले जातात. हा प्रसाद भाविक घरातील धान्यात किवा पैशाच्या कपाटात ठेवतात. 

आज (दि.17) कुस्त्यांचा हगामा भरणार असून, त्यास परराज्यातील मल्ल उपस्थित राहणार आहेत. राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक आल्याने ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली होती. सोहळ्यास दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक हजेरी लावतात, अशी माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष दादासाहेब चितळे व सरपंच राजेंद म्हस्के यांनी दिली. ग्रामस्थांनी भाविकांना महाप्रसादाचे वाटप केले. मंदिर परिसर नाथांच्या जयजयकाराने दुमदुमुन गेला होता. देवस्थान समितीकडून पिण्याचे पाणी, दर्शनबारी, मोफत निवास व्यवस्था करण्यात आली होती. मढी येथेही कानिफनाथांच्या दर्शनासाठी गर्दी झाली होती. वृद्धेश्‍वर, मोहटा देवी, हनुमान टाकळी येथेही भाविकांनी हजेरी लावली. माजी मंत्री तथा मायंबा देवस्थानचे सल्लागार सुरेश धस यांच्या मार्गदर्शनाखाली दर्शनबारीचे दुसर्‍या टप्प्याचे काम वेगात सुरू असून, पर्यटनस्थळ म्हणूनही मायंबा क्षेत्राचा विकास होत आहे. देवस्थानचे सचिव बाबासाहेब म्हस्के यांनी स्वागत केले.