Thu, May 23, 2019 21:09
    ब्रेकिंग    होमपेज › Ahamadnagar › कानिफनाथां पालखीला भाविकांची गर्दी (Video)

कानिफनाथां पालखीला भाविकांची गर्दी (Video)

Published On: Sep 01 2018 4:49PM | Last Updated: Sep 01 2018 6:06PMमढी (जि. अहमदनगर)  : वार्ताहर

श्री क्षेत्र मढी येथे श्रावण महिन्‍यातील तिसर्‍या शुक्रवार निमित्त राज्यातील हजारो भाविकांनी उपस्‍थिती लावली. कानिफनाथांच्या पालखी सोहळ्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. ढोल-ताशांचा निनाद, आतषबाजी, तालबद्ध वाजणारे ढोल, ताषे, डफ आणि शंखनाद याने परिसर दुमदुमला होता. 

कानिफनाथांची पालखी श्रावणातील प्रतेक शुक्रवारी निघते. तिसऱ्या शुक्रवारी मोठी गर्दी असते. रात्री माहाआरतीनंतर कानिफनाथांच्या मुख्य पालखीच्‍या मिरवणुकीस वाजत-गाजत प्रारंभ झाला. या मिरवणुकीत मराठे सरदार कान्होजी आंग्रे यांनी अर्पण केलेला पंचधातुचा घोडा व भगवा भव्य ध्वज असतो. कानिफनाथांच्या घोषणांनी  दुमदुमलेला आसमंत...फुलांनी सजवलेला पंचधातुचा घोडा...ढोल-ताशांचा निनाद... लेझीम...नाथांच्या पालखीवर चौकाचौकात केली जाणारी गुलाल व फुलांची उधळण ...भाविकांची दर्शनासाठी सुरू असलेली लगबग अशा उत्साही वातावरणात कानिफनाथांची पालखी पार पडली. ग्रामप्रदक्षिणा करून पुन्हा गडावर विसर्जन झाले. 

मध्यरात्रीपर्यंत मिरवणुक सुरू होती. भागरवाडी, लोणावळा, गिलबीले, नगर, आंळदी, जळगाव, पुणे, नाशिक, मावळ, ठाणे, मोशी या भागातील हजारो नाथ भक्त पायी पालख्यामध्ये सहभागी झाले. विविध मठांमध्‍ये दिवसभर महाप्रसाद झाला. गुरुवार ता. ३० रोजी रात्रीपासूनच मढी येथे दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. दत्त मंदिर समोर यात्रा मैदान येथील वाहनतळ पूर्ण भरल्याने पालखी मार्गाच्या दोन किमी अंतरावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. प्रंचड गर्दीमुळे मढीतील सर्वच स्‍तरावर वाहतुकीची कोंडी झाली. कानिफनाथांच्या संजीवन समाधी मंदिरात फुलांनी केलेली साजवट भाविकांचे लक्ष वेधत होती. मुख्य समाधी मंदिराला प्रदक्षिणा घालून पालख्या सायंकाळी गावाकडे मार्गस्थ झाल्या. देवस्थान समितीच्या वतीने आयोजित केलेला ह. भ. प. बाबासाहेब मरकड यांचा भारूडचा कार्यक्रम झाला.

देवस्थानचे अध्यक्ष अण्णासाहेब मरकड, सविव सुधीर मरकड, सहसचिव ज्योती मरकड, ग्रामपंचायत सरपंच रखमाबाई मरकड, रवींद्र आरोळे यांनी भाविकांचे स्वागत केले. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पाथर्डी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.