Sun, Nov 18, 2018 20:00होमपेज › Ahamadnagar › संगमनेरात कुंभार समाजाचा मोर्चा

संगमनेरात कुंभार समाजाचा मोर्चा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

संगमनेर : प्रतिनिधी

कुंभार समाज बांधव असणार्‍या वीटभट्टी धारकांवर केलेल्या दंडात्मक कारवाईच्या नोटिसा रद्द कराव्यात, तसेच मातीवरील रॉयल्टी शुल्क माफ करावे, यांसह अन्य मागण्यांसाठी संगमनेर-अकोले तालुका वीटउत्पादकांनी प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. सरकारच्या विरोधात मोर्चेकरांनी घोषणाबाजी करीत परिसर दणाणून सोडला होता.

शहरातील जाणता राजा मैदानावरून सरकारविरोधात घोषणाबाजी करत संगमनेर-अकोले तालुक्यातून आलेल्या वीटउत्पादक तसेच वीटभट्टीवरील मजुरांनी काढलेला मोर्चा बसस्थानक मार्गे प्रांताधिकारी कार्यालयावर येऊन धडकला. यावेळी मोर्चेकर्‍यांच्या वतीने कुंभार समाजाला विनाअट पाचशे ब्रास माती मिळाली पाहिजे, प्रदुषणाबाबतची जाचक अट रद्द करावी, वीटभट्टीसाठी बिगरशेतीची अट शिथिल करणे व वीट व्यवसायावर लावलेला जीएसटी रद्द करावा आदी प्रमुख मागण्यांचे निवेदन प्रांताधिकारी कार्यालयाचे नायब तहसीलदार मिलिंद कुलथे यांना देण्यात आले. या मोर्चात राज्य कुंभार समाज संघाचे अध्यक्ष संजय गिते, उपाध्यक्ष रमाकांत क्षीरसागर, संगमनेर-अकोले वीटउत्पादक संघाचे अध्यक्ष कैलास वाकचौरे, उपाध्यक्ष राजेंद्र जोर्वेकर, सचिव मच्छिंद्र जोर्वेकर, संतोष जोर्वेकर यांच्यासह संगमनेर-अकोले तालुक्यांतील वीट उत्पादक व मजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पाचशे ब्रास मातीचे परवाने देण्याऐवजी महसूल विभागाने प्रत्येकी शंभर ब्रास मातीचे 18 हजार रुपये उत्पादकांकडून सक्तीने जमा केले आहेत. अधिकारी पंख्याखाली बसून खोट्या पंचनाम्यांच्या आधारे नोटिसा बजावून वीटउत्पादकांना नाहक त्रास देत आहेत. महसूलच्या ‘वसुली’चे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सुरू असलेला हा प्रकार कुंभार समाजावर अन्यायकारक असल्याची भावना व्यक्त करुन महसूलने बजावलेल्या नोटिसा त्वरित मागे घ्याव्यात, अन्यथा हा समाज रस्त्यावर उतरून सरकारला जाब विचारेल, असा इशारा संघाचे अध्यक्ष कैलास वाकचौरे यांनी दिला.

Tag : kumbhar, community, strike, in sangamner, ahmadnagar,


  •