Thu, May 23, 2019 20:41
    ब्रेकिंग    होमपेज › Ahamadnagar › कुकडीच्या आवर्तनाने शेतकर्‍यांत आनंद

कुकडीच्या आवर्तनाने शेतकर्‍यांत आनंद

Published On: Feb 27 2018 2:05AM | Last Updated: Feb 26 2018 10:37PMकर्जत : प्रतिनिधी

रब्बी पिकांसाठी कुकडीचे आर्वतन नुकतेच सुटले आहे. पिकांना पाण्याची गरज असताना आवर्तन सुटल्याने शेतकरी वर्गामध्ये आनंद व्यक्त होत आहे. तालुक्यात रब्बी पिकांची विक्रमी पेरणी तालुक्यात झाली असून, या पिकांना सध्या पाण्याची गरज होती. त्यामुळे कुकडी लाभक्षेत्रात आवर्तन सोडण्याची मागणी शेतकरी वर्गामधून होत होती. आवर्तन टेल टू हेड असून, ते शेतीसाठी सोडण्यात आले आहे. 
कुकडीचे पाणी नगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदे, कर्जत व सोलापूर जिल्ह्यांतील करमाळा या तालुक्यांना मिळते. या सर्व तालुक्यांतील जवळपास एक लाख हेक्टर क्षेत्राचा यामध्ये समावेश असला, तरी सध्या कालव्याची परिस्थती पाहता, किमान 60 ते 70 हजार हेक्टर क्षेत्रास याचा लाभ प्रत्यक्षात होत आहे. यावेळी पावसाळ्यात ओव्हरफ्लोचे पाणी प्रथम सोडण्यात आले होते. पाऊस कमी झाल्यावर हे पाणी बंद करण्यात आले. मात्र त्यानंतर नियमित आवर्तन सल्लागार समितीची बैठक न घेताच पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी पाणी सोडले होते. मागील आवर्तन कुकडीच्या इतिहासात बहुदा सर्वांत जास्त दिवस म्हणजे जवळपास दीड महिना चालले.

तालुक्यात यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाला.  त्यामुळे रब्बी ज्वारी, हरभरा, गहू, कांदा, कापूस व ऊस अशी पिके घेण्यात आली.  याशिवाय फळबागा देखील मोठ्या प्रमाणात आहेत. द्राक्षाच्या बागा नव्याने तालुक्यात झाल्या आहेत. या सर्व पिकांना उगवण चांगली आहे. कर्जत तालुक्यात ज्वारीचे पिक मोठ्या प्रमाणात घेण्यात आले. यावेळी तालुक्यात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. ज्वारीची काढणी झाली असली, तरी गहू , मागास हरभरा, ऊस, उन्हाळी भुईमूग व फळबागांना पाण्याची गरज होती. आता आवर्तन सुटल्याने पीक हमखास साधले जाणार आहे. 

सीना धरणाचे आवर्तनही सोडावे

कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्डा येथील सीना धरणात दोन आवर्तने सोडता येतील, एवढे पाणी आहे. या परिसरात पावसावर रब्बी पेरण्या मोठ्या प्रमाणात झाल्या आहेत. परिसरात मोठ्या प्रमाणावर कापूस पिकवला जातो. मात्र पाऊस चांगला झाल्याने अनेक वर्षांनंतर उसाची लागवड करण्यात आली. या पिकांना पाण्याची गरज असून, सीनाचे आवर्तन तातडीने सोडण्यात यावे, यासाठी पालकमंत्री राम शिंदे यांनी पुढाकार घ्यावा, तसचे कुकडीचे पाणी सीना धरणाते सोडण्यात यावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.