Tue, Mar 19, 2019 09:50होमपेज › Ahamadnagar › कोरेगाव भीमा भागात जाळपोळ

कोरेगाव भीमा भागात जाळपोळ

Published On: Jan 02 2018 12:53AM | Last Updated: Jan 01 2018 11:56PM

बुकमार्क करा
कोरेगाव भीमा/शिक्रापूर : वार्ताहर

वढू बुद्रुक येथे शुक्रवारी (दि.  29 डिसेंबर) घडलेल्या जातीय तणावाचे पडसाद नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सोमवारी पेरणेफाटा (ता. हवेली) येथे विजयस्तंभाला मानवंदना देण्याच्या दिवशी उमटले. पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमा,  सणसवाडी,  शिक्रापूर व कोंढापुरी येथे संतप्त जमावाने मोठ्या प्रमाणात वाहनांची तोडफोड केली. या तोडफोडीत मोठ्या प्रमाणात  वित्तहानी झाली. कोरेगाव भीमा येथे सकाळी नऊपासून दंगलसदृश परिस्थिती असून, येथील अनेक गाड्यांची, घरांची व दुकानांची तोडफोड करून काही गाड्या पेटविण्यात आल्या. वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथे शुक्रवारी सकाळी विजयस्तंभाच्या कार्यक्रमाच्या पार्श्‍वभूमीवर एक सामाजिक शांततेची बैठक शिक्रापूर पोलिसांनी बोलावली होती.

या बैठकीपूर्वी सकाळी सव्वादहाच्या सुमारास गावातील काही युवकांनी फलक काढून टाकत समाधीवर असलेल्या छताची नासधूस केली. यावर स्थानिक दलित समाजाने आक्षेप घेतला व गावातील काही दुकाने बंद पाडण्यास भाग पाडले. यानंतर मोठ्या संख्येने विविध दलित समाज संघटनांचे प्रतिनिधी गावात हजर झाले. शिक्रापूर पोलिसांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनेचे गांभीर्य वाढू लागताच जिल्हा पोलिस अधीक्षक सुवेझ हक हे दाखल झाले. 

दंगल नियंत्रण पथकासह जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय, शिरूर व रांजणगाव पोलिस स्टेशनचे पोलिस पथकही दाखल झाले. यावेळी हक यांनी दोन्ही गटांशी स्वतंत्र चर्चा केली.  यावेळी मागासवर्गीय संघटनेच्या प्रतिनिधींशी स्वतंत्र बैठक घेऊन या प्रकरणी दोषींवर अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्याची ग्वाही दिली व या प्रकरणाची पुढील बैठक दि. 4 जानेवारी रोजी घेण्याचे निश्‍चित करण्यात आले. त्यामुळे हा वाद मिटला होता.

मात्र, सोशल मीडियावर सोमवारी सकल मराठा मोर्चा निघणार असल्याची पोस्ट फिरत होती. त्यामुळे कोरेगाव भीमा, सणसवाडी आदी गावांमध्ये नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने ‘बंद’ पाळला होता. मराठा समाजाच्या वतीने पुणे-नगर महामार्गावर रॅली आयोजित केली होती. यामध्ये मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली. दुपारी 12 च्या सुमारास पेरणे फाटा येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी आलेल्या काही लोकांनी जोरदार दगडफेक करण्यास सुरुवात केली. याचा परिणाम होऊन दोन्ही गटांच्या बाजूने दगडफेक झाली. दगडफेक करणार्‍या गटाने पुणे-नगर महामार्गालगत असलेल्या दुकानांच्या पाट्या फोडण्यास सुरुवात केली, तर रस्त्यालगत लावण्यात आलेल्या दुचाकी गाड्या फोडून त्या पेटविल्या. दोस्ती चौकातील चार ते पाच दुचाकी गाड्या पेटविण्यात आल्या. अनेक घरांवर दगडफेक करण्यात आली.

दुपारच्यावेळी नगर रस्त्यावरील सत्यनारायण कापड दुकान, जय भवानी हॉटेल, स्टेट बँकेचे एटीएम, हॉटेल जनता पॅलेस आदी फोडण्यात आले, तर या ठिकाणी लावण्यात आलेल्या गाड्यांची तोडफोड करून त्या भररस्त्यात पेटवून देण्यात आल्या. सायंकाळी चार वाजेपर्यंत पोलिसांच्या वतीने शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले होते. परंतु, पोलिसांची संख्या अपुरी पडत असल्याने वातावरण जास्त चिघळले होते. अखेर चारनंतर अश्रूधुराचे नळकांडे फोडून जमाव पांगविण्याचा प्रयत्न करण्यात आला. कोरेगाव भीमा येथे घबराटीचे वातावरण होते. दुचाकी वाहने, यशराज दूध डेअरीचे टेम्पो, 407 टेम्पो जाळण्यात आले, तर अनेक चारचाकी वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या.

पोलिसांच्या मदतीला राज्य राखील पोलिस दलाची तुकडी, दंगलविरोधी पथक होते. कोरेगाव भीमामध्ये सायंकाळच्या सुमारास काचांचा खच पडला होता.  महामार्गावरील बाजार मैदानाच्या मोकळ्या जागेत लावलेल्या गाड्यादेखील पेटविण्यात आल्या. कोरेगाव भीमा येथे तणाव झाल्याचे वृत्त शिक्रापूर परिसरात दुपारी पसरले. यानंतर एक जमाव नगर महामार्गावर उतरला व घोषणाबाजी करत त्यांनी शिक्रापूरमधील सर्व दुकाने बंद केली. नगरवरून पुण्याच्या दिशेने जाणारी सर्व वाहने शिक्रापूर-चाकणमार्गे वळविण्यात आली होती. दुपारच्या सुमारास एका समाजाचा जमाव रस्त्यावर घोषणा देत 15 ते 20 मिनिटे झोपून राहिला होता. यामुळे वाहतूक बंद पडली. शिक्रापूर येथे मलठण फाट्यावर दोन बसगाड्यांवर दगडफेक करण्यात आली. यामध्ये बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील अग्निशमन विभागाचा बंब सणसवाडी येथे जात असताना समाजकंटकांनी दगडफेक करून फोडल्याने वाहन चालक गंभीर जखमी झाला.