Tue, Mar 19, 2019 11:58होमपेज › Ahamadnagar › कोरेगाव भीमा घटनेचे नगरमध्ये पडसाद

कोरेगाव भीमा घटनेचे नगरमध्ये पडसाद

Published On: Jan 02 2018 10:46PM | Last Updated: Jan 02 2018 10:46PM

बुकमार्क करा
नगर : प्रतिनिधी

पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा परिसरात झालेल्या घटनेचे नगर जिल्ह्यात मंगळवारी (दि. 2) काही प्रमाणात पडसाद उमटले. नगर शहरासह जिल्ह्यातील विविध भागात एसटी बस, खासगी वाहने, दुकानांवर दगडफेक करण्यात आली. तसेच काही ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला. राहाता बसस्थानकावरील दगडफेकीत तीन महिला जखमी झाल्या आहेत. पोलिसांनी दगडफेक करणार्‍या संशयितांची धरपकड सुरू केली आहे. 

घटनेची गांभीर्य ओळखून बाहेरून राज्य राखीव पोलिस दलाच्या दोन तुकड्या, नाशिक परिक्षेत्रातून 15 दंगल नियंत्रण पथके, अशी अतिरिक्त कुमक मागविण्यात आली आहे. जिल्ह्यातील एक हजार पोलिसांना सार्वजनिक व संवेदनशील ठिकाणी नियुक्त करण्यात आले आहे. इतर काही अधिकारी व कर्मचारी आरोपींच्या शोधात आहेत. सोमवारी (दि. 1) कोरेगाव भीमा येथील घटनेनंतर एक जखमी युवक भिंगारला आल्यानंतर तणाव निर्माण होऊ लागला. भिंगारमधील दुकाने अनेक व्यावसायिकांनी बंद केली. मध्यरात्रीच्या सुमारास शहरातील नीलक्रांती चौकात एसटी बसवर दगडफेक करण्यात आली. रात्रीपासूनच सोशल मीडियावरून वेगवेगळे संदेश व्हायरल होऊ लागले. त्यामध्ये अफवांचाही भरणा होता.

मंगळवारी (दि.2) सकाळी नगर शहरातील माळीवाडा बसस्थानक येथे काही युवकांचा जमाव गोळा झाला. जमावातील युवकांनी बसस्थानकात उभ्या असलेल्या 10-12 एसटी बसेसवर दगडफेक करून काचा फोडल्या. तसेच बसस्थानकालगतच्या रस्त्यांवरील खासगी वाहनांवरही दगडफेक केली. खासगी ट्रॅव्हलबस, ट्रक, खासगी कारवर दगडफेक करण्यात आली. शहरात सुमारे 9-10 ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या. जिल्ह्यातील राहुरी, राहाता, श्रीरामपूर येथेही दगडफेक झाली. श्रीरामपुरात वाहनांऐवजी दुकाने बंद करण्यासाठी दुकानांवर दगडफेक करण्यात आली. तेथे निषेध मोर्चाही काढण्यात आला. राहुरी, कोल्हार बुद्रूक येथे रास्ता रोको आंदोलनही करण्यात आले. राहाता येथे झालेल्या दगडफेकीत बसस्थानकात बसलेल्या तीन महिला जखमी झाल्या आहेत. इतर ठिकाणी शारीरिक हानीची घटना घडलेली नाही. फक्त सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्यात आलेले आहे. कोरेगाव भीमा येथील घटनेत जखमी झालेले दोनजण नगरच्या खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याचे समजते.