Thu, Jun 27, 2019 16:40होमपेज › Ahamadnagar › नगर विकासासाठी सर्वांनी एकत्र यावे

नगर विकासासाठी सर्वांनी एकत्र यावे

Published On: Dec 30 2017 12:33AM | Last Updated: Dec 29 2017 10:52PM

बुकमार्क करा
कोपरगाव : प्रतिनिधी

शहराचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर ‘तू- तू, मै-मै’  करण्यात काहीही अर्थ नाही. ज्या हेतूने नागरिकांनी आपल्याला निवडून दिले आहे, त्यांच्या समस्या प्राधान्याने सोडविणे हे आपले कर्तव्य आहे. राजकारणाच्या ठिकाणी राजकारण करा. आपले काही बांधाला बांध नाही. मन व मतभेद एकमेकांत होऊ देवू नका व श्रेय वादावरून व्हॉटस-अ‍ॅप वॉर सुरू आहे ते प्रथम बंद करा, असा सल्ला आ. स्नेहलता कोल्हे यांनी दिला.

कोपरगाव नगरपालिकेत शुक्रवारी झालेल्या आढावा बैठकीप्रसंगी त्या अध्यक्षपदावरून बोलत होत्या.  या बैठकीस नगराध्यक्ष विजय वहाडणे, उपनगराध्यक्ष विजय वाजे, मुख्याधिकारी शिल्पा दरेकर उपस्थित होते. 

नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी शहर विकासासाठी शासनाकडून निधी आणण्यासाठी सर्व नगरसेवकांसह आ. कोल्हे यांचे सहकार्य घेऊ सेच प्रत्येकाने येथून पुढे शहर विकासासाठी आत्मपरिक्षण करावे. आपल्यात व आमदार कोल्हे यांच्यात दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये. नागरिकांच्या प्रश्‍न सोडविण्याला प्राधान्य द्या व समन्वयक करा, असा सल्ला त्यांनी वाजे यांनी दिला. 
या आढावा बैठकीत शहर विकासाच्या निगडीत असलेल्या बहुतांशी प्रश्‍नांवर उपस्थित नगरसेवक,नागरिक प्रतिनिधी, नगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांच्यात चांगल्याच शाब्दीक चकमकी उडाल्या. प्रारंभी सेनेचे गटनेते योगेश बागुल व गटनेते रवींद्र पाठक यांनी स्वागत केले. 

प्रास्तविक माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांनी केले. ते म्हणाले, शहरात कामांचा मोठा डोंगर उभा आहे.  आमदार कोल्हे यांनी मंत्रालयीनस्तरावरून कोट्यवधी रुपयांचा निधी आणला असून तो पडून आहे. तो वापरून विकास कामात सर्वांनी अग्रेसर रहावे. 

आ. कोल्हे यांनी शहरात सुरू असलेल्या 42 कोटी रूपये खर्चाची पाणी पुरवठा योजना, नगरपालिका इमारत व ग्रंथालय इमारत, विविध प्रभागातील रस्ते, भुयारी गटार योजना, दलित वस्ती सुधारणा, महिला व पुरूषांसाठीचे स्वच्छतागृहे, घनकचरा व्यवस्थापन, आदी मुलभूत व महत्वाच्या प्रश्‍नांवर चर्चा केली.  हे प्रलंबित प्रश्‍न नगराध्यक्ष, मुख्याधिकारी व सर्व नगरसेवकांनी आलेल्या निधीतून त्वरीत मार्गी लावावेत, अशा सूचना दिल्या.