Tue, May 21, 2019 04:13होमपेज › Ahamadnagar › ‘कोपर्डी’च्या आरोपींवर  हल्ला; चौघांना सक्तमजुरी

‘कोपर्डी’च्या आरोपींवर  हल्ला; चौघांना सक्तमजुरी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

नगर : प्रतिनिधी

कोपर्डी निर्भयाकांडातील आरोपींवर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारात प्राणघातक हल्ला करून पोलिसांना जखमी करणार्‍या चौघांना न्यायालयाने बुधवारी पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठाविण्यात आली आहे. या चौघांना मंगळवारी दोषी ठरविण्यात आले होते.

शिक्षा झालेल्या आरोपींमध्ये अमोल सुखदेव खुणे (25), गणेश परमेश्‍वर खुणे (28, दोघे रा.रुई धानोरा, ता.गेवराई, जि. बीड), बाबूराव वामन वाळेकर (30), राजेंद्र बाळासाहेब जराड पाटील (21, दोघे रा. अंकुशनगर, ता.अंबड, जि. जालना) यांचा समावेश आहे. वेगवेगळ्या कलमान्वये शिक्षा ठोठावून सर्व शिक्षा एकाचवेळी भोगण्याचा आदेश देण्यात आला आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी हा निकाल दिला आहे. सरकारी पक्षाच्या वतीने अ‍ॅड. मंगेश दिवाणे यांनी काम पाहिले.

याबाबत माहिती अशी की, दि. 1 एप्रिल 2017 रोजी कोपर्डी खटल्याची नगरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात नियमित सुनावणी सुरू होती. या दिवशीच्या सुनावणीनंतर तत्कालीन न्या. सुवर्णा केवले यांनी पुढील सुनावणी दि. 17 एप्रिल रोजी ठेवली. त्यामुळे आरोपींना घेऊन पोलिस कर्मचारी न्यायालय आवारातून पोलिस वाहनाकडे चालले होते. त्यावेळी हातात सत्तूर व इतर घातक शस्त्रे घेऊन शिवबा संघटनेचे चारजण कोपर्डीतील आरोपींच्या दिशेने धावले. परंतु, पोलिस कर्मचारी मदतीला धावून गेले व त्यांनी शिवबा संघटनेच्या या कार्यकर्त्यांना पकडले. या झटापटीत पोलिस कर्मचारी रवींद्र टकले हे जखमी झाले होते. याप्रकरणी कँप पोलिस ठाण्यात सहाय्यक फौजदार विक्रम भारती यांनी फिर्याद दिली होती. त्यावरून चौघांविरुद्ध भारतीय दंड विधान 307, 353, 120 ब, 332, 34, भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

सहाय्यक पोलिस निरीक्षक कैलास देशमाने यांनी गुन्ह्याचा प्राथमिक तपास केला. गुन्ह्यात ‘अ‍ॅट्रॉसिटी’चे कलम वाढविण्यात आले. त्यानंतर तपास सहाय्यक पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांच्याकडे वर्ग करण्यात आला होता. न्या. नावंदर यांच्यासमोर खटल्याची सुनावणी झाली. सरकारी पक्षातर्फे एकूण 7 साक्षीदार तपासण्यात आले. सहाय्यक निरीक्षक कैलास देशमाने, जखमी रवींद्र टकले यांची साक्ष महत्त्वाची ठरली. 

न्यायालयाने मंगळवारी (दि. 27) सायंकाळी सर्व आरोपींना खुनाचा प्रयत्न, शासकीय सेवकास दुखापत, सरकारी कामात अडथळा आणणे, गुन्ह्याचा कट रचणे आदी कलमाखाली दोषी ठरविले होते. मात्र, भारतीय हत्यार कायदा व अ‍ॅट्रॉसिटीच्या आरोपातून आरोपींची मुक्तता करण्यात आली आहे.


  •