Sun, Aug 25, 2019 04:25होमपेज › Ahamadnagar › किरण हजारेविरुद्ध आता ‘एमपीडीए’ अन्वये कारवाई

किरण हजारेविरुद्ध आता ‘एमपीडीए’ अन्वये कारवाई

Published On: Jul 01 2018 1:51AM | Last Updated: Jun 30 2018 10:50PMनगर : प्रतिनिधी

कोपरगाव तालुक्यातील कुख्यात गुंड किरण माधव हजारे (वय 32, रा. तीनचारी, कोकमठाण, ता. कोपरगाव) याच्याविरुद्ध ‘एमपीडीए’ अन्वये कायद्यान्वये एक वर्ष स्थानबद्धेची कारवाईस मंजुरी मिळाली आहे. पोलिसांनी सादर केलेला प्रस्तावानंतर जिल्हा दंडाधिकारी राहुल द्विवेदी यांनी हा आदेश काढला आहे. हजारे हा सध्या ‘मोक्का’ अन्वये झालेल्या कारवाईत नाशिक मध्यवर्ती कारागृहातील कोठडीत आहे.

गुंड किरण हजारे याच्याविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोर्‍या, फसवणूक, बेकायदा शस्त्रे बाळगणे, मारहाण, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आदी गंभीर स्वरुपाचे 17 गुन्हे दाखल आहेत. त्यातील 16 गुन्हे नगर जिल्ह्यातील व एक पुणे जिल्ह्यातील शिरूर पोलिस ठाण्यातील आहे. एकट्या कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात तब्बल 12 गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे काही दिवसांपूर्वीच त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आलेली आहे.

हजारे याला ‘एमपीडीए’ कायद्यान्वये स्थानबद्ध करण्यासाठी पोलिस अधीक्षक रंजन कुमार शर्मा व अपर अधीक्षक रोहिदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक सागर पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार, कोपरगाव शहरचे पोलिस निरीक्षक दौलत जाधव, उपनिरीक्षक श्रीधर गुठ्ठे, कर्मचारी मधुकर शिंदे, रवींद्र कर्डिले, किरण जाधव आदींनी परिपूर्ण प्रस्ताव तयार केला होता. जिल्ह्यातील वाळूमाफिया, झोपडपट्टी दादा, अत्यावश्यक वस्तूंचा काळा बाजार करणारे, दारू विक्रेते, समाज विघातक गुन्हेगारांना जरब बसविण्यासाठी पोलिस प्रशासनाने सराईत गुन्हेगारांना एक वर्षे तुरुंगात स्थानबद्ध करण्यासाठी ‘एमपीडीए’ अन्वये कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांच्या प्रस्तावावरून जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी गेल्या पंधरा दिवसांत ही दुसरी कारवाई केली आहे.