Thu, Apr 25, 2019 03:55होमपेज › Ahamadnagar › काठ्यांच्या मिरवणुकीने यात्रेची सांगता 

काठ्यांच्या मिरवणुकीने यात्रेची सांगता 

Published On: Jan 05 2018 1:04AM | Last Updated: Jan 04 2018 10:21PM

बुकमार्क करा
कान्हूरपठार : वार्ताहर

भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या पिंपळगाव रोठा (ता. पारनेर) येथील श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थानच्या गेले तीन दिवस सुरू असलेला यात्रोत्सवाची गुरूवारी सांगता झाली. यात्रेच्या शेवटच्या व मुख्य दिवशी मानाच्या बेल्हे  (जि.पुणे) व ब्राम्हणवाडा येथील काठ्यांच्या मिरवणुकीनंतर झालेल्या शासकीय महापुजेनंतर या काठ्यांनी  कळस व देवदर्शन घेतले. इतर गावच्या काठ्यांच्या मिरवणुकीनंतर यात्रेची सांगता झाली व भाविक परतीच्या मार्गाला लागले. दरम्यान यात्रा काळात सुमारे सहा लाखांवर अधिक भाविकांनी श्री खंडोबाचे दर्शन घेतले गुरूवारी सुमारे तीन लाख भाविक कोरठणला दाखल झाले होते. 

गुरुवारी पहाटे 5 वा. बाळकृष्ण गायकर, शारदा गायकर यांच्या हस्ते श्री खंडोबाची महापूजा, महाआरती झाल्यानंतर भाविकांना दर्शन खुले करण्यात आले. पहाटेपासूनच भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती. दरम्यान आ.विजय औटी यांनीही बुधवारी सायं. खंडोबाची महाआरती केली. गुरूवारी सकाळी आठ वा श्री खंडोबाची चांदीची पालखी व इतर गावच्या पालख्या यांची  मिरवणूक सुरू झाली. दुपारी एक वाजता मिरवणूक मंदिरासमोर आल्यानंतर देवस्थानकडून पालखी मानकर्‍यांचा सन्मान करण्यात आला.

दुपारी 2 वाजता यात्रेचे मुख्य आकर्षण असलेल्या मानाच्या बेल्हे व ब्राम्हणवाडा येथील काठ्यांच्या शाही मिरवणुका हजारो भाविकांच्या उपस्थितीत सुरू झाल्या. दोन्ही काठ्या मंदिरासमोर आल्यानंतर या  काठ्यांची  तहसीलदार भारती सागरे व पोलिस निरीक्षक हनुमंत गाडे यांनी शासकीय महापूजा केली. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड. पांडुरंग गायकवाड, उपाध्यक्ष गंगाराम बेलकर, नायब तहसीलदार दत्तात्रय भावले, विश्‍वस्त मोहन घनदाट, किसन धुमाळ, दिलीप घोडके, अमर गुंजाळ, बन्सी ढोमे, किसन मुंडे, चंद्रभान ठुबे, अश्‍विनी थोरात, मनिषा जगदाळे, हनुमंत सुपेकर, सरपंच अशोक घुले, उपसरपंच बाळासाहेब पुंडे, रामदास मुळे, जालिंदर खोसे, शांताराम खोसे, गोपीनाथ घुलेे, देवीदास क्षीरसागर,महेंद्र नरड यांच्यासह लाखो भाविकांचा जनसमुदाय उपस्थित होता.

महापुजेनंतर महाआरती झाली. यानंतर ब्राम्हणवाडा येथील काठीने देवदर्शन घेतले व बेल्हे येथील काठीने कळस दर्शन घेतले. यानंतर इतर गावच्या काठ्यांच्या मिरवणूका झाल्या. यात्रेदरम्यान पोलिस उपअधीक्षक मनिष कलवानिया यांनी पोलिस बंदोबस्ताची पाहणी केली. शिवसेना जिल्हा उपप्रमुख रामदास भोसले,  पुणे जि.प.चे माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार, मा. जि. प.सदस्य बाबासाहेब तांबे, गटविकास अधिकारी विशाल तनपुरे आदींनी यात्रेत उपस्थिती लावली. नगर जिल्ह्यााबरोबरच मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे येथून भाविक आले होते. सर्वाधिक भाविक पुणे जिल्ह्यातून आले होते. यात्रेत शेती साहित्य, मिठाई, खेळणी, घरगुती साहित्य यांच्या विक्रीतून मोठी आर्थिक उलाढाल झाली. एसटीकडून भाविकांच्या सोयीसाठी जादा बस सोडण्यात आल्या होत्या.

पोलिस निरीक्षक गाडे यांनी चोख पोलिस बंदोबस्त व वाहतूक व्यवस्था ठेवली होती. क्रांती शुगरच्या सुरक्षा रक्षकांनी सुरक्षा व्यवस्था सांभाळली. आरोग्य विभागाने तत्पर सेवा दिली. जय मल्हार विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी व अळकुटी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वयंसेवकाचे काम केले.