Wed, Jul 17, 2019 12:25होमपेज › Ahamadnagar › वाळूच्या ८ बोटी फोडल्या

वाळूच्या ८ बोटी फोडल्या

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कर्जत : प्रतिनिधी 

पोलिस उपअधीक्षक सुदर्शन मुंढे आणि प्रांतधिकारी अर्चना नष्टे यांच्या नेतृत्त्वाखाली पोलिस व महसूल विभागाच्या संयुक्त पथकाने भिमा नदीपात्रात वाळू तस्करांचे कंबरडे मोडले. या कारवाईत महागड्या आठ फायबर बोटी फोडण्यात आल्या. या कारवाईमध्ये पोलिस निरीक्षक वंसत भोये, तहसीलदार किरण सावंत, उपनिरीक्षक पालवे यांच्यासह अनेक कर्मचारी हे सहभागी झाले होते.

कर्जत तालुक्यातील भिमानदीच्या पात्रामध्ये सर्वच अहोरात्र बेसूमार वाळू उपसा सुरू आहे. अनेक गावांतील नागरिकांनी प्रशासनाकडे वाळू उपसा बंद करण्याची मागणी वारंवार केली. वृत्तपत्रांनीही हा प्रश्‍न उचलून धरला आहे. मात्र, प्रशासनातील झारीतले शुक्राचार्य आणि वाळू तस्करांचे तालुक्यात घट्ट नाते असल्याने कारवाई होत नव्हती. मात्र आज पहाटे तालुक्यातील बेर्डी, सिध्दटेक, भांबोरा, वाटलूज, राजेगाव या नदीपात्राच्या परिसरात कारवाई करण्यात आली. पहाटे महसुल आणि पोलिसांनी कारवाई करताना अतिशय चांगले नियोजन केले होते. त्यांनी अनेक पथके तयार केली होती. एकाचवेळी जमिन आणि पाणी या दोन्ही ठिकाणी कारवाई करण्यात आली. अचानक झालेल्या या कारवाईमध्ये वाळू माफियांची चांगलीच पळापळ झाली. मात्र बोटी पळवून नेण्यात अनेकांना यश आले नाही. अनेक बोटी पकडण्यात आल्या. या पकडलेल्या बोटी स्फोट करून फोडण्याचे काम सायंकाळपर्यंत सुरू होते.

पर्यावरणाचे मोठे नुकसान

बेर्डी, सिध्दटेक, गणेशवाडी, जलालपूर, दुधोडी, भांबोरा, खेड, औटेवाडी, शिंपोरा, बाभुळगाव ही गावे असलेल्या सुमारे 17 किमी नदीपात्रामध्ये  रोज हजारो ब्रास वाळू उपसा होत आहे. तो यंत्रणेला हाताशी धरुनच होत आहे. बेसुमार वाळू उपशामुळे पर्यावरण धोक्यात आले आहे. भिमा नदीपात्रामधील वाळू संपल्याने नदीपात्र मागील वर्षी कोरडे पडले होते. त्यामुळे शेतामधील ऊस जळून गेला. शेतकर्‍यांना कोटयावधी रूपयांचे नुकसान सहन करावे लागले होते. जलचर प्राणी नष्ट झाले. रस्ते खराब झाले.  

तलाठ्यांवर कारवाई का होत नाही?

नदीपात्रांवर तलाठ्यांचे नियंत्रण असते. वाळू उपशाची माहिती वरिष्ठांना देणे हा त्यांच्या कामाचाच एक भाग आहे. मात्र ते वरिष्ठांना माहिती का देत नाहीत. तलाठ्यांनी ठरविले तर वाळूचा बेकायदा उपसाच होणार नाही. ज्याच्या हद्दीत उपसा होतो, त्यांच्यावर प्रांताधिकार्‍यांनी कारवाई केल्यास असे प्रकार भविष्यात टाळता येतील. कारवाईमधून काही भाग वगळला भिमा नदीपात्रामध्ये कारवाई झाली. मात्र यामध्ये खेड, गणेशवाडीसह काही भाग वगळण्यात आला. याचे नेमके कारण समजले नाही.