Thu, May 23, 2019 14:23
    ब्रेकिंग    होमपेज › Ahamadnagar › राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेची तयारी

राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेची तयारी

Published On: Dec 23 2017 2:02AM | Last Updated: Dec 22 2017 9:17PM

बुकमार्क करा

कर्जतः प्रतिनिधी 

राज्याच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र यांचे वतीने जिल्ह्यामध्ये प्रथमच होत असलेल्या कर्जत येथील छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी स्पर्धेची जोरदार तयारी येथे सुरू आहे. या स्पर्धेसाठी कर्जत शहरामध्ये खास क्रीडानगरी उभी करण्यात येत असून, याला थोर संत सदगुरू गोदडमहाराज यांचे नाव देण्यात आले आहे. 

काल सकाळी येथे कबड्डीचा थरार पाहण्यासाठी येणार्‍या पे्रक्षकांच्या बसण्यासाठी भव्य अशी गॅलरी उभी करण्यात आली आहे. याचे उद्घाटन प्रांतधिकारी अर्चना नष्टे यांचे हस्ते झाले. यावेळी स्पर्धेचे स्वागताध्यक्ष नामदेव राऊत, संयोजन समितीचे प्रमुख सुभाष तनपुरे, उपनगराध्यक्ष बापूसाहेब नेटके, जिल्हा क्रीडा अधिकारी उदय जोशी, क्रीडा अधिकारी ज्ञानेश्‍वर खुरंगे, रामदास हजारे, नितीन तोरडमल, अनिल गदादे, गटविकास अधिकारी दत्तात्रय दराडे, तालुका कृषि अधिकारी राजेंद्र सुपेकर, तहसीलदार किरण सांवत, गटशिक्षाधिकारी शिंदे, आरोग्य अधिकारी पुंड, दादा शिंगाडे, दत्ता नेवसे, अजित वडवकर, सुनिल नेवसे, शांताराम बावडकर, प्रकाश सांळुके, शिवाजी धांडे, पंडीत, शहाजी राजेभोसले यांचेसह  मान्यवर,  नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.

कर्जत येथे जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या पुढाकाराने  27 डिसेंबर ते 2 जानेवारी या कालावधीमध्य खुली पुरूष आणि महिलांची राज्य पातळीवरील ‘छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा’ भरवली जाणार आहे.

  राज्य सरकाराच्या वतीने घेण्यात येणार्‍या या स्पर्धेची जोरदार तयारी सध्या सुरू आहे. या स्पर्धेमध्ये मुलांचे 16 व मुलींचे 16 असे 32 संघ सहभागी होणार आहेत. यासाठी 25 हजार प्रेक्षक बसतील असे क्रीडांगन तयार करण्यात येत आहे. यासाठी  प्रथम राज्य सरकराने 96 लाख 65 हजार एवढा निधी दिला आहे. याशिवाय आमदारांचे 61 लाख 65 हजार रुपये मिळणार आहे. या स्पर्धेसाठी 1 कोटी 25 लाख रूपयांचा निधी खर्च करणार असून भव्यदिव्य असे संयोजन करण्यात येणार आहे. 

नगराध्यक्ष नामदेव राऊत म्हणाले की, या स्पर्धेच्या संयोजनामध्ये संपूर्ण तालुका सहभागी झाला आहे. राज्यात कोठेही झाले नाही अशा प्रकारचे आयोजन येथे होणार आहे. प्रांताधिकारी अर्चना नष्टे  म्हणाल्या की, कर्जत येथे होणार्‍या या राज्यस्तरीय स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे.