Fri, Jul 19, 2019 05:47होमपेज › Ahamadnagar › आधी भाव जाहीर करा, मग गाळप

आधी भाव जाहीर करा, मग गाळप

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कर्जत : प्रतिनिधी

उसाला भाव प्रथम जाहीर करा आणि नंतरच उसाचे गाळप करा, तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा शिवाजीराव नांदखिले यांनी अंबालिका कारखाना येथे दिला.

अंबालिका कारखान्याने या वर्षीचा उसाचा भाव जाहीर करावा या मागणीसाठी शेेतकरी संघटनेच्या वतीने कारखान्याच्या गेटमध्ये धरणे आंदोलन सुरू झाले आहे. या आंदोलनात शेतकरी संघटनेचे नेते व सरपंच अशोक जगताप, जिल्हाध्यक्ष लालासाहेब सुद्रिक, जिल्हा उपाध्यक्ष संजय तोरमडल, सरपंच भाऊसाहेब सुपेकर, कांतीलाल माळवदकर, पोपट सुपेकर, दत्तू गुंड, नसीर बेग, सुनिल सुद्रिक, शिवाजी सुद्रिक, विकास गोडसे, रामदास जगताप, दादासाहेब गायकवाड, बबन वारगड, कुंडलिक माळवदरक, आबा काळे हे पदाधिकारी व शेतकरी सहभागी झाले होते. पोलिस निरीक्षक वसंत भोये यांच्यासह मोठा पोलिस बंदोबस्त कारखान्यावर ठेवण्यात आला होता.आंदोलक कारखान्यावर आल्यावर वातावरणात तणाव होता. मात्र आंदोलकांनी आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले. 

नांदखिले म्हणाले की, उसाला 3 हजार 400 रूपये भाव प्रथम जाहीर करावा. आज शेतकर्‍याच्या कोणत्याच मालास भाव नाही. कांद्याच्या भावाची हमी नाही, उडीद आहे पण घेत नाहीत, अशा प्रकारे षेतकरी संकटात आला आहे. उसाचा भाव जाहीर झाला नाही, तरीही कारखाने उस घेत आहेत आणि शेतकरीही त्यांना देत आहेत. कारखान्यास उस दिल्यावर चौदा दिवसांच्या आत त्याचे पैसे शेतकर्‍याच्या खात्यावर जमा करण्याचा नियम आहे. मात्र अंबालिका कारखान्याने 26 दिवस झाले तरी उसाचे पैसे दिलेले नाहीत. उसाचा दर जाहीर करुन लेखी आश्‍वासन द्यावे. 

लालासाहेब सुद्रिक म्हणाले की, शेत माल विकला तर कुटूंब जगते. आज शेतकर्‍यांनी ऊस देवून इतके दिवस झाले तरी त्यांना पैसे कारखान्याने दिले नाहीत. उसाचा भाव पुणे जिल्ह्याप्रमाणे द्यावा.

संजय तोरडमल म्हणाले की, शेतकरी आज पूर्णपणे मोडकळीस आला आहे. 3 हजार 400 रूपये भाव द्यावा. कारखान्याच्या कार्यस्थळावर कारखान्याचे आधिकारी व संघटनेचे नेत्यांमध्ये बैठक झाली होती. मात्र त्यावेळी भावाचा निर्णय झाला नाही. म्हणून संघटनेने आंदोलन सुरू केले आहे.