Thu, Jun 04, 2020 03:29होमपेज › Ahamadnagar › ‘अंबालिका’ने थकविले शेतकर्‍यांचे पैसे

‘अंबालिका’ने थकविले शेतकर्‍यांचे पैसे

Published On: Dec 23 2017 2:02AM | Last Updated: Dec 22 2017 9:27PM

बुकमार्क करा

कर्जत : प्रतिनिधी

अजित पवार यांचा कर्जत तालुक्यातील अंबालिका साखर कारखान्याने गळीत हंगाम सुरू करुन 2 महिने होत आले, तरीही शेतकर्‍यांचे पैसे दिलेले नाहीत. एफआरपी नुसार ही रक्कम 64 कोटी 37 लाख रूपये होत आहे. हे पैसे थकविल्याने साखर आयुक्तलयाने या कारखान्यासह जिल्ह्यातील इतर दोन कारखान्यांनाही नोटिस काढली आहे. त्यामुळे आता कारखान्यावर काय कारवाई होते, या कडे शेतकर्‍यांचे लक्ष लागले आहे.

कर्जत तालुक्यातील बारडगाव सुद्रिक या गावाजवळ सुमारे 200 एकर क्षेत्रावर माजी उपमुख्यमंत्री यांचा अंबालिका हा खाजगी साखर कारखाना आहे. एकाच कारखान्यामध्ये दोन कारखाने उसाचे गाळप करीत असल्याने हा कारखाना गाळपामध्ये जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर असतो. वीज निर्मिती आणि अन्य उपपदार्थ निर्मितीचे प्रकल्प येथे आहेत. या कारखान्याचा भावही या पूर्वी इतर कारखान्यांपेक्षा जास्त होता. मात्र मागील गळीत हंगामाचा शेवटचा हप्ता कारखान्याने दिलेला नाही. 

सर्वात जास्त गाळप करणार्‍या अंबालिका कारखान्यास नगरसह पुणे, सोलापूर, उस्मानाबादमधूनही शेतकरी ऊस पाठवितात. यंदा कारखान्याने भाव जाहीर करावा, यासाठी शेतकरी संघटनेने आंदोलन केले होते. तरीही अंबालिका कारखान्याने उसाचा दर अद्याप जाहीर केलेला नाही.

नियमाचा भंग

शेतकर्‍यांनी ऊस दिल्यावर 14 दिवसांच्या आत पैसे देण्याचा नियम आहे. मात्र आज कारखान्याचे गाळप सुरू होवून 52 दिवस झाले तरीही एक रूपयाही पहिला हप्ता दिलेला नाही. या पूर्वी साखर उपसंचालक प्रादेशिकच्या संगिता डोंगरे यांनीही अंबालिका कारखान्यास नोटिस काढली होती. त्यावेळी पैसे देण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र ते त्यांनी पाळले नाही. आता साखर आयुक्तांनी नोटिस काढली आहे. त्यामुळे काय कारवाई होते, याकडे शेतकर्‍यांचे लक्ष लागले आहे.

साखरेचे घसरते दर हिच अडचण

सध्या साखरेचे दर 30 रूपये आहे. तो सतत कमी होत आहेत. त्यामुळे उसाला काय भाव द्यावा या काळजीत कारखानदार पडले आहेत. असे असले तरीही पहिला हप्ता तातडीने देण्याची गरज होती. जिल्ह्यातील 14 कारखान्यांनी पहिला हप्ता दिला आहे. अंबालिका, गंगामाई आणि पियुश या कारखान्यांनी अद्याप पहिला हप्ता दिलेला नाही. आज जिल्ह्यात सर्वात जास्त भाव श्रीगोंद्यातील माजीमंत्री बबनराव पाचपुते यांच्या साईकृपा (फेज 1 देवदैठण) कारखान्याने 2 हजार 551 रुपये दिला आहे.
.. तर रस्त्यावर उतरू 

शेतकर्‍यांचे पैसे तातडीने न दिल्यास आंदोलनाचा इशारा शेतकरी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष लालासाहेब सुद्रिक आणि अशोक जगताप यांनी दिला आहे. त्यांनी सांगितले की, 52 दिवसांनंतरही अंबालिकाने पैसे दिलेले नाहीत. ते व्याजासह द्यावेत. हा कारखाना अजित पवार यांचा असल्याने शेतकरी बोलण्यास घाबरत असले, तरी आम्ही हक्कासाठी बोलणार. रस्त्यावर उतरणार. साखर आयुक्तांनी अंबालिकारवर कारवाई करावी, अशी मागणी करणार आहोत.