Mon, Jun 24, 2019 16:39होमपेज › Ahamadnagar › केडगाव हत्याकांड फसलेला ‘द‍ृश्यम’ !

केडगाव हत्याकांड फसलेला ‘द‍ृश्यम’ !

Published On: Apr 13 2018 1:12AM | Last Updated: Apr 13 2018 7:44AMनगर : प्रतिनिधी

केडगाव दुहेरी हत्याकांडप्रकरणी पोलिसांत हजर झालेल्या संदीप गुंजाळ याने संजय कोतकर व वसंत ठुबे या दोघांची हत्या कशा पद्धतीने केली, याचा सर्व घटनाक्रम पोलिसांना सांगितला आहे. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दोन्ही गावठी कट्टे हस्तगत करण्यात आले आहेत. सुरुवातीला गोळ्या घातल्या, त्यानंतर धारदार शस्त्राने सपासप वार केले व त्यानंतर गळा कापून हत्या केल्याची कबुली त्याने दिली आहे. निवडणुकीच्या वादातूनच हा खून झाल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले आहे.

एखाद्या गुन्हेगारी चित्रपटाप्रमाणे केडगावात थरार घडल्यानंतर पोलिसांत हजर झालेल्या संदीप गुंजाळ ऊर्फ डोळसे याने सुरुवातीला पोलिसांची दिशाभूल करणारी माहिती देत, गुन्ह्यातून इतरआरोपींना वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु, पालिसी खाक्यासमोर त्याचा हा प्रयत्न अयशस्वी झाला. त्यामुळे केडगाव हत्याकांड म्हणजे ‘द‍ृश्यम’ असल्यासारखे वाटते. त्या चित्रपटातील कथानकाप्रमाणेच आरोपी गुंजाळने सुरुवातीला पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्यादृष्टीनेच पोलिसांनी तपासही केला.

आरोपी गुंजाळ याने पोलिसांना सांगितलेला घटनाक्रम असा की, केडगाव पोटनिवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेचे उपशहरप्रमुख संजय कोतकर व वसंत ठुबे हे दोघे शनिवारी (दि. 7) दुपारी महाज्योत हॉटेल येथे पार्टीसाठी बसले होते. तेथे पोटनिवडणुकीतील मतदानावरून कोतकर यांनी रवि खोल्लम याला शिवीगाळ केली. खोल्लम याच्या परिसरातून शिवसेनेच्या उमेदवाराला कमी मते पडल्याने फोनवरील संभाषणात दोघांची चांगलीच खडाजंगी झाली. त्यावेळी कोतकर याने खोल्लम याला ‘तू घरी थांब. तुझ्याकडे येतो. तुझ्याकडे पाहतो’, अशी धमकी दिली. त्यानंतर कोतकर व ठुबे हे दुचाकीवरून केडगावमधील सुवर्णनगर परिसरातील खोल्लम याच्या घराकडे निघाले.

दरम्यानच्या काळात खोल्लम याने फोनवरील संभाषण नूतन नगरसेवक विशाल कोतकर, औदुंबर कोतकर यांच्या कानावर घातले. खोल्लम याने संजय कोतकर यांनी दिलेल्या धमकीच्या निरोपाची माहिती दिली. त्यानंतर विशाल कोतकर याने तातडीने संदीप गुंजाळ याला फोन करून खोल्लम याच्या घरी पाठविले. त्याला मारण्यासाठी दोघे येत असल्याचे सांगितले. त्यानंतर गुंजाळ हा खोल्लम याच्या घरी गेला. तेथे गेल्यानंतर खोल्लम याच्या वडिलांना खोल्लम याच्याबाबत विचारणा केली. त्यांनी तो बाहेर गेल्याचे सांगितले. तो घरापासून काही अंतरावर येताच त्याला संदीप बाळासाहेब गिर्‍हे (रा. शाहूनगर, केडगाव), महावीर ऊर्फ पप्पू रमेश मोकळ व त्यांच्यासोबत असलेला आणखी एक साथीदार दिसला. गिर्‍हे व मोकळ यांनी विशाल कोतकर याने पाठविल्याचे गुंजाळ याला सांगितले. 

त्यांच्यात संभाषण चालू असतानाच दुचाकीवरून आलेले संजय कोतकर व वसंत ठुबे हे दोघे गुंजाळ याला दिसले. ते समोरून येताच खोल्लम याला मारण्यासाठीच हे आले आहेत, असे समजून गुंजाळ याने कोतकर यांना शिवीगाळ सुरू केली. त्यावेळी काही अंतरावर ठुबे हे गिर्‍हे, मोकळ यांच्यासोबत बोलत होते. दोघांत कशावरून तरी वाद झाला व संतापलेल्या गुंजाळ याने कोतकर यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यातील दोन गोळ्या लागताच कोतकर हे खाली कोसळले. कोतकर यांच्यावर गोळ्या झाडताच भीतीपोटी ठुबे हे पळून जाऊ लागले. ते पळून जात असतानाच गिर्‍हे याने ठुबे यांच्या दिशेने गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. एक गोळी लागल्यावरही ठुबे खाली पडले नाहीत. त्यामुळे गिर्‍हे याने दुसरी गोळी झाडली. त्यानंतर ठुबे हे जमिनीवर कोसळले. ठुबे यांच्याजवळ जाऊन त्यांच्या छातीवर पाय ठेवून गिर्‍हे याने ठुबे यांच्यावर गोळ्या झाडल्या. दोन गोळ्या झाडल्यानंतर खाली पडलेले कोतकर मयत झाल्याचे समजून गुंजाळ हा ठुबे यांच्या दिशेने आला. 

तेथे आल्यानंतर गुंजाळ याने ठुबे यांच्या अंगावर धारदार शस्त्राने सपासप वार केले व कोयत्याने गळा कापला. तेथून कोतकर यांच्याकडे पाहत असताना ते मोबाईलवर बोलत असल्याचे दिसले. त्यामुळे गुंजाळ याने कोतकर यांच्याकडे धाव घेतली व त्यांच्यावर सपासप वार केले. शेवटी कोयत्याने गळा कापून टाकला. अतिशय क्रूर पद्धतीने कोतकर व ठुबे यांचा खून करताच गुंजाळ ऊर्फ डोळसे याने गिर्‍हे याच्याकडील पिस्तुल ताब्यात घेतले. त्यानंतर ‘तुम्ही तिघेही येथून निघून जा. मी माझ्या अंगावर सर्व घेतो’, असे म्हणून तिघांनाही पाठवून दिले. त्यानंतर गुंजाळ हा पारनेरकडे निघाला. केडगावहून हिवरे बाजारकडे जाणार्‍या रस्त्याने निघालेल्या गुंजाळ याने त्याच्याकडील एक मोबाईल हॅण्डसेट तोडून टाकला. सीमकार्ड फेकून दिले. त्यानंतर रस्त्यावरील नाल्यातील बोळीत गिर्‍हे याच्याकडील गावठी कट्टा फेकून दिला. त्यानंतर तोफखाना पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक संजय सोने यांना फोन करून खून केल्याची कबुली देऊन पारनेर पोलिस ठाण्यात हजर होत असल्याचे सांगितले. सोने हे सुट्टीवर होते. त्यांनी तातडीने सहाय्यक पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांना गुंजाळ याने दिलेली माहिती कळविली.

पारनेर पोलिस ठाण्यात शरण जाताना गुंजाळ याने त्याच्या खिशातील चार जीवंत काडतुसे पोलिस ठाण्यातील कचर्‍यात टाकून दिली. खून अंगावर घेण्यासाठी त्याने गिर्‍हे, मोकळ व त्याच्या साथीदाराला पळून जाण्यास सांगितले. मोबाईल हॅण्डसेट तोडून टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. तसेच गुन्ह्यात वापरलेला एक गावठी कट्टा टाकून दिला. ‘द‍ृश्यम’ या चित्रपटाप्रमाणे जीवंत काडतुसे पोलिस ठाण्यातच टाकून हा प्रकार कोणाच्याही निदर्शनास येणार नाही, असा प्रयत्न केला. पोलिसांत हजर झाल्यानंतर पोलिसांना चुकीची माहिती देऊन खून अंगावर घेण्याच्या प्रयत्न केला. तसेच पोलिसांना केलेला फोन नंबरच माझा आहे, दुसरा फोन वापरत नाही, असा बनाव करून विशाल कोतकर याच्याशी केलेल्या संभाषणाचा नंबर देण्याचे टाळले. पोलिसांच्या तपासाची दिशा भरकटवून ‘द‍ृश्यम’ या बॉलिवूडपटाप्रमाणे अनेकांना गुन्ह्यापासून वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्या चित्रपटाप्रमाणे तो खर्‍या आरोपींना गुन्ह्यापासून वाचवू शकला नाही. यातून केडगाव हत्याकांड म्हणजे फसलेला ‘द‍ृश्यम’ असल्याचे दिसून येत आहे. 

चौकट‘पीएसआय’ऐवजी झाला खुनी

आरोपी संदीप गुंजाळ हा महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करत होता. त्याने पोलिस उपनिरीक्षक पदाची मुख्य परीक्षाही दिलेली आहे. परंतु, अंतिम यादीत त्याची निवड होऊ शकली नाही. स्पर्धा परीक्षा देणार्‍या तरुणांसाठी त्याने केडगावमध्ये अ‍ॅकॅडमीही सुरू केलेली आहे. पोलिस उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न असलेल्या गुंजाळचा स्वप्नभंग होऊन तो अखेर खुनी झाला. 

Tags : Ahamadnagar, kedgaon, double, murder, case