Sat, Jul 20, 2019 09:13होमपेज › Ahamadnagar › केडगाव दुहेरी हत्या : चार दिवसांच्या आत दोषारोपपत्र

केडगाव दुहेरी हत्या : चार दिवसांच्या आत दोषारोपपत्र

Published On: Jul 03 2018 1:50AM | Last Updated: Jul 02 2018 11:49PMनगर : प्रतिनिधी

केडगाव दुहेरी हत्याकांडातील आरोपींविरुद्ध राज्य गुन्हे अन्वेषण विभागाला चार दिवसांच्या आत दोषारोपपत्र दाखल करावे लागणार आहे. आरोपींच्या अटकेच्या प्रक्रियेला 90 दिवस पूर्ण होत असल्याने ‘सीआयडी’कडून कागदपत्रांची अंतिम जुळवाजुळव सुरू आहे, असे सूत्रांकडून समजले.

केडगाव येथील पोटनिवडणुकीच्या निकालानंतर 7 एप्रिल रोजी सायंकाळी दोन शिवसैनिकांची निर्घृण हत्या झाली होती. खुनानंतर काही तासांतच मारेकरी संदीप गुंजाळ हा पारनेर पोलिस ठाण्यात शरण आला होता. 8 एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास गुन्ह्यातील काही आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींना रविवार, दि. 8 एप्रिल रोजी न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. या प्रक्रियेला चार दिवसांत 90 दिवस पूर्ण होत आहेत. त्यामुळे न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपींना फायदा होऊ नये, यासाठी ‘सीआयडी’ला आरोपींविरुद्ध पहिले दोषारोपपत्र चार दिवसांच्या आत दाखल करावे लागणार आहे. 

या गुन्ह्यात संदीप गुंजाळ, आ. संग्राम जगताप, बी. एम. कोतकर, बाळासाहेब कोतकर, बाबासाहेब केदार, रवी खोल्लम, संदीप गिर्‍हे, नगरसेवक विशाल कोतकर, भानुदास कोतकर आदी आरोपींना अटक करण्यात आलेले आहे. फिर्यादीत आरोपी म्हणून उल्लेख असलेल्या आ. शिवाजी कर्डिले, आ. अरुण जगताप वगळता इतर आरोपींविरुद्ध स्टॅडिंग वॉरंट जारी करण्यात आले होते. तरीही एकही आरोपी पोलिसांत हजर झाला नाही किंवा त्यांना अटक करण्यात आलेले नाही. 90 दिवसांच्या आत दोषारोपपत्र दाखल करावे लागणार असल्याने ‘सीआयडी’कडून कागदपत्रांची अंतिम जुळवाजुळव सुरू आहे.

कोतकरच्या जामिनावर 9 ला सुनावणी

भानुदास कोतकर याच्या जामीन अर्जावर म्हणणे सादर करण्यासाठी आरोपीच्या वकिलांनी काल (दि. 2) मुदत वााढवून मागितली. त्यामुळे या जामीन अर्जावर 9 जुलै रोजी सुनावणी होणार आहे. त्या अगोदरच दोषारोपपत्र दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच मुदत वाढवून मागितली असू शकते, असा अंदाज आहे.