Tue, Mar 26, 2019 02:17होमपेज › Ahamadnagar › दोन मुख्यमंत्र्यानी घेतले शनीदेवाचे दर्शन

दोन मुख्यमंत्र्यानी घेतले शनीदेवाचे दर्शन

Published On: Jan 02 2018 12:53AM | Last Updated: Jan 01 2018 11:41PM

बुकमार्क करा
कौठाः वार्ताहर

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिह चव्हाण यांनी शनी शिंगणापूर येथे येऊन शनी दर्शन घेतले. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचे दुपारनंतर शनी मंदिर परिसरात आगमन झाले. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांचे आगमन झाले. दोन्ही मुख्यमंत्री आल्यामुळे भाविकांना तब्बल एक ते दीड तास शनी दर्शन बंद करण्यात आले होते. 

मुख्यमंत्री फडणवीस यांचे नगर-औरंगाबाद रस्त्यावरील घोडेगाव येथे हेलिकॉप्टरने आगमन झाले. त्यांच्यासमवेत आ. शिवाजीराव कर्डीले होते. आ. बाळासाहेब मुरकुटे, आ. विनायक मेटे, नगरसेवक सुवेंद्र गांधी, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, भाजपचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्‍वर पेचे यांनी त्यांचा सन्मान केला. यावेळी रेल्वे कृती समितीच्या सदस्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले. मंदिरातील उदासी महाराज मठात शनी अभिषेक केला व नंतर चौथर्‍यावर जाऊन तेल अर्पण करत दर्शन घेतले. देवस्थानच्या जनसंपर्क कार्यालयात अध्यक्षा अनिता शेटे व उपाध्यक्ष नानासाहेब बानकर यांनी मुख्यमंत्र्यांचा सन्मान केला. 

 दोन्ही मुख्यमंत्री यांची भेट शनी मूर्तीसमोर समोर झाली व त्यांनी एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. तालुका भाजपच्यावतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी नेवासे तालुक्यातील भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘मुख्यमंत्री जिंदाबाद, भारतीय जनता पार्टीचा विजय असो’ अशा घोषणा देण्यात आल्या. तालुक्यातील विविध विकासकामांबाबत भाजपा तालुकाध्यक्ष ज्ञानेश्‍वर पेचे यांच्यासह पदाधिकार्‍यांनी निवेदन दिले.